राजनांदगाव - अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. काहीजण एखाद्या ट्रॅफिक पोलिसाने वाहन अडवले तर थेट नेत्यांना फोन लावून सुटण्याचा प्रयत्न करतात. छत्तीसगडच्या एका राजकीय कार्यकर्त्यानेही हाच प्रकार केला. परंतु या घटनेमुळे काँग्रेस आमदार छन्नी साहू चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
एका कार्यकर्त्याच्या वाहनाचे चलान भरण्यासाठी महिला आमदाराने थेट गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. आरटीओ अधिकाऱ्याशी झालेल्या वादातून महिला आमदाराने हे संतप्त पाऊल उचलले. मंगळसूत्र विकून चलानाची रक्कम भरावी. जर चलान भरल्यानंतर पैसे वाचले तर ते परत द्या. मंगळवारी ही घटना घडली. धान्याने भरलेले वाहन आरटीओ अधिकाऱ्याने एका रस्त्यात पकडले. वाहनचालकाने गाडी सोडण्याची विनंती केली असता अधिकाऱ्यांनी काहीही ऐकले नाही. तेव्हा या कार्यकर्त्याने थेट महिला आमदाराला फोन लावला.
महिला आमदाराने अधिकाऱ्याशी संवाद साधला परंतु वाहन सोडण्यास नकार दिल्याने आमदार थेट परिवहन कार्यालयात पोहचल्या. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, दुर्ग स्क्वॉयडजवळ आरटीओ पथकाने हे वाहन पकडले. हे वाहन धान्याने भरले होते. पिकअप ओव्हरलोड होता. ज्याकारणाने तो पकडला गेला. या वाहनावर अधिकाऱ्यांनी ४२ हजार रुपये चलान फाडले. त्यानंतर आमदारांनी फोन करूनसुद्धा कार्यकर्त्याचे वाहन सोडले नाही.
कार्यकर्त्याचे वाहन सोडवण्यासाठी आमदार आरटीओ कार्यालयात आल्या त्यांनी फोनवर संवाद केलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. जेव्हा अधिकाऱ्याने ऐकले नाही तेव्हा महिला आमदाराने गळ्यातील मंगळसूत्र काढून हे विकून चलान भरावं असं रागात म्हणाल्या. अधिकारी आमच्या कार्यकर्त्याकडे ४२ हजारांऐवजी ५२ हजार मागत असल्याचा आरोप महिला आमदाराने केला.