सीमा महांंगडेअकरावी प्रवेशाच्या नेहमीच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेणे पसंत केले आहे. अल्पसंख्याक, इनहाउस, व्यवस्थापन कोट्यातून अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत आणि अकरावीसाठीची आपली तयारी क्लासेसद्वारे सुरू केली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. हल्ली कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांना जास्त मागणी असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआयसारख्या संस्थेत प्रवेश मिळाल्याने या प्रवेशांकडे आपली पाठ फिरवली आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
मुळातच यंदाच्या अकरावी प्रवेशाची स्थिती वेगळी आहे, ती मुळापासून जाणून घेतल्याशिवाय नेमका गोंधळ रिक्त जागांचा आहे की विद्यार्थ्यांच्या पसंतीचा आणि त्यांना मिळालेल्या गुणाचा, हा विषय स्पष्ट होऊ शकेल. त्यातही या प्रवेशाच्या गोंधळात काही महाविद्यालये आणि खासगी क्लासेसवाले ज्या पद्धतीने पडद्याआडून सर्व सूत्रे चालवत आहेत, त्याकडे कोणाचेही लक्ष जाताना दिसत नाही. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ आहेतच, मात्र या वेळी असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झालेले असताना त्यांना प्रवेश न घेण्यापासून प्रवृत्त करणारी टीम ही पडद्याआड असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत काही संघटना व्यक्त करतात. पुण्यातल्या सिस्कॉमसारख्या संस्थेने या प्रवेशामध्ये होत असलेल्या गैरप्रकाराचे अनेक दाखले आणि त्यासाठीचे पुरावे शिक्षण मंडळाकडे सादर केलेले असताना त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने आजचा हा गोंधळ घडत असल्याचे ते सांगतात.नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे यंदाही अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया गोंधळात सुरू झाली आणि ती गोंधळाच्या वातावरणात सुरूच आहे. अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. मात्र पहिल्या यादीतही तब्बल ४८ हजार विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ११ हजार विद्यार्थ्यांनी त्याकडे आपली पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीत तब्बल ७२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत, मात्र त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या यादीची वाट पाहणे पसंत केले आहे. मात्र पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांचे मात्र कोडे उलगडेनासे झाले आहे.एकीकडे प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे या गोंधळामुळे उशिरा सुरू होणाºया महाविद्यालयांची चिंता विद्यार्थ्यांना आहे. महाविद्यालये सुरू कधी होणार आणि अभ्यास कधी करणार, असा प्रश्न काही विद्यार्थी-पालकांना सतावत आहे. काही पालकांनी याचे उत्तर शोधण्यासाठी कोचिंग क्लासेसची वाट धरली आहे. प्रवेशासाठीच्या जागा निश्चित झालेल्या असतानाही विद्यार्थ्यांना प्रवेशामधील पडद्यामागील यंत्रणेचा तपास घेण्याची गरज आहे, तरच या गोंधळातून मार्ग निघू शकेल. यासाठी यंत्रणेसोबत शासनानेही या प्रवेश प्रक्रियेवर तितकाच वचक ठेवणे आवश्यक आहे.मला दहावीत ५० टक्के गुण मिळाले असून, माझे अजून कोणत्याही कॉलेजमध्ये अॅडमिशन झाले नाही. पहिली लिस्ट येऊन गेली. दुसºया लिस्टची वाट बघतोय. मला ठाण्यातील गुरुकुल कॉलेजमध्ये अॅडमिशन हवे आहे. मला अस वाटतेय की, पहिल्या दुसºया व तिसºया लिस्टमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये शिक्षकांना शिकवायला आणि विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळेल. लिस्टमध्ये नाव नाही आले, तर ऑफलाइन फॉर्म भरून अॅडमिशन करेन. उशिरा होणाºया या प्रोसेसमुळे माझे काही नुकसान होऊ नये, म्हणून मी आत्ताच क्लासेस लावलेत. - राजदीप चौहानमला दहावीत ६० टक्के गुण मिळाले. मला भवन्स महाविद्यालयात अॅडमिशन हवे होते, पण पहिल्या यादीत माझे नाव आले नाही. माझ्या मित्रांना माझ्याहून अधिक टक्के मिळाले. म्हणून त्यांना पहिल्या यादीतमध्येच अॅडमिशन मिळाली. मी खासगी क्लासेसदेखील आधीच लावले आहेत. कॉलेज उशिरा सुरू होतेय, म्हणून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल की नाही, असे प्रश्न मनात आहेत. मला वाटतंय की, माझे दुसºया नाहीतर तिसºया यादीत नाव येण्याची शक्यता आहे. - शुभम बच्चेमला पाटकर कॉलेज हवे होते. मी आधीपासून पाटकरलाच प्राधान्य दिले. सोईस्कर म्हणून मी इनहाउस कोट्यातून अर्जदेखील भरला होता. अॅडमिशन प्रक्रिया किचकट असल्यामुळे सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला होता. आपल्याला हवे असलेले कॉलेज मिळेल किंवा नाही मिळणार, अशी धाकधूक मनात होती. मला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असल्यामुळे पाटकर कॉलेज हवे आहे. मी आॅनलाइन अर्जामध्ये पाटकरचे नाव सुरुवातीला टाकले होते. नवीन कॉलेज आणि कॉलेज जीवन याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे, तसेच अभ्यासाचे दडपणदेखील आहे. अभ्यासाच्या भीतीने आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायला लागेल. - सुशांत लांजेकर