नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला रविवारी नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्याचवेळी, मोदी यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग व मोहम्मद कैफ यांच्या ऐतिहासिक भागीदारीची आठवण करुन देत, ‘कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताला अशाच भागीदारीची गरज आहे,’ असे म्हटले.
मोदींनी युवराज व कैफ यांच्या भागीदारीचा उल्लेख करताना टिष्ट्वट केले की, ‘आपले दोन क्रिकेटपटू असे आहेत, ज्यांची भागीदारी देश कधीही विसरू शकत नाही. त्यांना नेहमीच आठवणीत ठेवले जाईल. आता पुन्हा अशाच भागीदारीची आपल्याला गरज आहे. या वेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एकमेकांचा भागीदार बनण्याची आवश्यकता आहे.’ मोदी यांनी गुरुवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. मोदींच्या या आवाहनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पाठिंबा दिला. त्यात युवी व कैफ यांचाही समावेश होता. २००२ साली नेटवेस्ट ट्रॉफी अंतिम सामन्यात इंग्लंडने दिलेले ३२६ धावांचे आव्हान यशस्वीपणे पार करत भारताने जेतेपद पटकावले होते. लॉर्डस मैदानावरील हा अंतिम सामना युवी-कैफ यांच्या भागीदारीमुळे भारताला जिंकता आला. धावांचा पाठलाग करताना भारताने १४६ धावांत अर्धा संघ गमावलेला, मात्र युवी-कैफ यांनी निर्णायक १२१ धावांची भागीदारी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
Web Title: Coronavirus: Fighting against Corona: 'Need for decisive partnership like Yuvraj-Kaif'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.