नवी दिल्ली: श्रीलंकेला नमवून 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील एक खेळाडू सध्या मॅच फिक्सिंग प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या खेळाडूचे मॅच फिक्सिंग करणाऱ्या रॅकेटशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या खेळाडूने मॅच फिक्सिंग करणाऱ्या रॅकेटला मदत करुन देशांतर्गत टी-20 मालिकेतील सामना फिक्स केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.राजपुताना प्रीमियर लीगमधील (आरपीएल) काही घटनांची गेल्या वर्षापासून राजस्थान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु आहे. बीसीसीआयच्या अॅण्टी करप्शन सिक्युरिटी युनिटला आरपीएल स्पर्धेत काळेबरे आढळून आल्याने या स्पर्धेतील घटनांची चौकशी सुरु झाली. या स्पर्धेत क्लब क्रिकेटर्सचा सहभाग होता. निओ स्पोर्ट्सने या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले होते. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या व्यक्तीचे मोठ्या रॅकेटशी संबंध असल्याचे राजस्थान पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मास्टरमाईंडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या एका खेळाडूशी संबंध आहेत. सध्या हा खेळाडू भारताकडून खेळत नाही. मात्र 2011 च्या विश्वविजेत्या संघात हा खेळाडू होता. राजपुताना प्रीमियर लीगमधील अनेक घटना संशयास्पद ठरल्या होत्या. या स्पर्धेतील एका महत्त्वाच्या सामन्यात एकाच षटकात तब्बल 8 वाईड बॉल टाकण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे हे सामन्यातील अखेरचे षटक होते. या घटनेमुळे मॅच फिक्सिंगचा संशय निर्माण झाला. त्यामुळे बीसीसीआयने राजस्थान पोलिसांना या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी 14 जणांची चौकशी केल्यावर 2011 च्या विश्वविजेत्या संघातील 'त्या' खेळाडूचे नाव समोर आले. या 14 जणांना जयपूरमधील 4 हॉटेल्समधून ताब्यात घेण्यात आले होते. आरपीएलमध्ये बेटिंग आणि फिक्सिंग केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी 14 जणांना अटक केली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 2011 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूनं मॅच फिक्सिंग केल्याचा संशय
2011 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूनं मॅच फिक्सिंग केल्याचा संशय
'त्या' खेळाडूचे मॅच फिक्सिंग करणाऱ्या रॅकेटशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 8:44 AM