भारतीय क्रिकेटर बनला तरी अत्यंत वाईट प्रसंगांतून गेलेला शमी पुरता सावरला आहे. तीनवेळा आत्महत्येचा विचार करणाऱ्या शमीने पत्नीकडून मिळालेल्या त्रासातून सावरत जगातील भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरविली आहे. काल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीने सात विकेट मिळवित भारताला फायनलमध्ये पोहोचविले आहे.
शमी नसता तर कदाचित भारताला हे शक्य झाले नसते. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला अन् शमीला संधी मिळाली. कदाचित शमी सारखा हिरा भारताला सापडलाच नसता. वयाच्या १७व्या वर्षी मोहम्मद शमीने १९ वर्षाखालील संघासाठी ट्रायल दिली होती. पण तेव्हा त्याची निवड झाली नव्हती. कदाचित पुढेही झाली नसती. परंतू एका फोन कॉलने शमीसाठी दरवाजे उघडले. शमीचे प्रशिक्षक बदरूद्दीन यांना कोलकातावरून एक फोन आला अन् तिथूनच शमीला 'क्रिकेट'मय प्रवास सुरू झाला. विश्वचषकात 50 विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेळा ५ विकेट घेणारा देखील शमीच ठरला आहे.
कौटुंबिक कलह, वाद यामुळे त्रस्त झालेल्या शमीने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्याचा खुलासा खुद्द शमीने केला होता. खरं तर शमीला त्याची पत्नी हसीन जहॉंमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागला. पत्नीसोबतच्या वादामुळे तो मानसिक तणावात होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून वाद अद्याप कायम आहे. याच कारणामुळे भारतीय खेळाडूच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार आला होता. कोलकात्याच्या अलीपूर जिल्हा न्यायालयाने शमीला अंतरिम देखभाल म्हणून पत्नी हसीन जहाँला दरमहा ५०,००० रुपये देण्याचे निर्देश दिले होते.
न्यूझीलंडच्या मॅचमध्ये भारतीय गोलांदाजांना यश काही करून मिळत नव्हते. शमी आला आणि त्याने सुरुवातीला दोन विकेट घेतले. नंतर रोहितने स्पिनर्सचा मारा सुरु केला. न्यूझीलंडची धावसंख्या वेगावे वाढू लागली होती, परंतू विकेट काही मिळत नव्हता. म्हणून रोहितने परत शमीला आणले, शमीने क्रिझवर टिकलेल्या फलंदाजाला बाद केले आणि त्याच्याजागी आलेल्यालाही परत पॅव्हेलिअनमध्ये पाठविले. न्यूझीलंड चार विकेटवर खेळत होता. इतर सर्व गोलांदाज सपशेल फेल ठरत होते. पुन्हा शमी आला आणि त्याने न्यूझीलंडचा तंबूच उखडून फेकला. सात विकेट घेत भारताचा विजय निश्चित केला. ही वेळ अशी होती की भारताच्या हातातून सामना जातो की काय असे वाटत होते. कदाचित काल शमी नसता तर न्यूझीलंडने कालचा सामना जिंकला असता. कदाचित भारत फायनलमध्येही नसता.