AB de Villiers Retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'मिस्टर ३६० डिग्री', 'सुपरमॅन' अशी ओळख असलेल्या द.आफ्रिकेच्या एबीडी व्हिलियर्सनं निवृत्तीची घोषणा केली आहे. एबीडी व्हिलियर्सच्या घोषणेनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यापुढे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार नसल्याचं डिव्हिलियर्सनं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. त्यासंबंधिची सविस्तर पोस्ट डिव्हिलियर्सनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
एबीडी व्हिलियर्सच्या निवृत्तीचा फटका आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)संघाला बसणार आहे. याआधीच विराट कोहली यानं संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात आता डीव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे संघाला दुहेरी धक्का बसला आहे. डिव्हिलियर्सनं निवृत्तीची घोषणा करताना आजवरच्या त्याच्या क्रिकेट करिअरबाबत सविस्तर उल्लेख केला असून त्यानं सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
डिव्हिलियर्सची पोस्ट जशीच्या तशी...
आजवरचा प्रवास खरंच खूप भन्नाट होता. पण आता मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
अगदी घराच्या अंगणात मोठ्या भावासोबत खेळण्यापासून ते आतापर्यंत मी अगदी मनापासून क्रिकेट खेळलो आणि त्याचा आनंद लुटला. आता वयाच्या ३७ व्या वर्षी आधीसारकी ऊर्जा राहिलेली नाही आणि हे सत्य मला स्वीकारलं पाहिजे. हे अगदीच अचानक वाटत असलं तर तसं नाहीय. म्हणून मी आज ही घोषणा करतोय. माझी वेळ आली आहे.
क्रिकेटनं मला खूप मायेनं जवळ केलं आहे. मग ते टायटन्ससाठी खेळणं असो, द.आफ्रिकेसाठी असो किंवा मग आरसीबीसाठी. जगात कुठेही असो. या खेळानं मला विचारही करू शकणार नाही असे अनुभव आणि संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी मी कायमच ऋणी राहिन.
मला माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांचे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे, प्रत्येक प्रशिक्षकाचे, फिजिओ आणि प्रत्येक स्टाफ मेंबरचे आभार व्यक्त करायचे आहेत. ज्या सर्वांनी माझ्यासोबतचा हा प्रवास अनुभवला आहे. मला द.आफ्रिका आणि भारताबरोबतच जगभरामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलो तिथे मिळालेला पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो.
माझ्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाशिवाय, तडजोडींशिवाय हे सारं काही शक्य नव्हतं आणि याची मला पूर्ण जाणीव आहे. माझे पालक, भाऊ, पत्नी डॅनिली आणि माझी मुलं. या सर्वांना आता मी प्राधान्य देणार आहे.