Join us  

पाकिस्तानी गोलंदाजाच्या बाऊन्सरने अफगाणिस्तानचा फलंदाज रक्तबंबाळ; थोडक्यात बचावला जीव

PAK vs AFG 3rd T20 : अफगाणिस्तानने ट्वेंटी-20 मालिकेत प्रथमच पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 1:19 PM

Open in App

ihsanullah bowling speed । शारजाह : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना काल शारजाह येथे खेळवला गेला. मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून अफगाणिस्ताननेपाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 116 धावांत गारद झाला आणि 66 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

मात्र, यादरम्यान अफगाणिस्तानचा स्फोटक फलंदाज नजीबुल्ला झादरानचा जीव थोडक्यात बचावल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानी गोलंदाज इहसानुल्लाहचा जीवघेणा बाऊन्सर अफगाणिस्तानच्या फलंदाजाच्या थेट मानेवर लागला. चेंडू वेगाने लागल्यामुळे नजीबुल्ला झादरानच्या मानेतून काही प्रमाणात रक्त देखील आले. या घटनेनंतर सर्व खेळाडूंना धक्का बसला आणि मैदानात शांतता पसरली. दुखापतीमुळे अफगाणिस्तानचा खेळाडू मैदानाबाहेर गेला.  

11 व्या षटकांत घडली दुर्घटना पाकिस्तानने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 71 धावांत चार गडी गमावले होते, त्यानंतर झादरान खेळपट्टीवर फलंदाजीला आला. त्याला पाकिस्तानचा इहसानुल्लाह डावाच्या 11व्या षटकात गोलंदाजी करत होता. दुसऱ्या चेंडूवर नबीला बाद केल्यानंतर इहसानुल्लाहने झादरानचे बाऊन्सरने स्वागत केले आणि या चेंडूवर स्वत:ला सावरताना झादरान अपयशी ठरला. झादरानच्या ग्लोव्हजवर आदळल्यानंतर इहसानुल्लाहचा चेंडू हेल्मेटच्या ग्रिलमधून जबड्याच्या खालचा भाग आणि मानेच्या वरच्या भागामध्ये थेट गेला. यानंतर पाकिस्तानचे सर्व खेळाडू झादरानकडे धावत आले आणि त्यांनी हेल्मेट काढले तेव्हा रक्त स्पष्ट दिसत होते. यानंतर मैदानाबाहेर गेला आणि नंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झाला.

सामन्यानंतर इहसानुल्लाहने घेतली गळाभेटझादरानने मैदान सोडल्यानंतर पुढच्या चेंडूवर इहसानुल्लाहने करीम जनतचा त्रिफळा काढून अफगाणिस्तानला आणखी एक धक्का दिला. अफगाणिस्तानचा संघ 116 धावांत गारद झाला आणि तिसरा सामना 66 धावांनी गमावला. मात्र, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे अफगाणिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली. तर सामना संपल्यानंतर झादरानेही मैदानात पाऊल ठेवले आणि इहसानुल्लाहने त्याची गळाभेट घेतली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :अफगाणिस्तानपाकिस्तानटी-20 क्रिकेटआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App