mitchell starc ipl 2024: आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला तब्बल २०.५० कोटी रूपयांत सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण, अवघ्या दीड तासात चित्र बदलले अन् मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. आयपीएल २०२४ साठी मंगळवारी दुबईत मिनी लिलाव पार पडला. कमिन्स आणि स्टार्कशिवाय इतरही परदेशी खेळाडूंनी बक्कळ कमाई केली. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने परदेशी खेळाडूंवर पैसा ओतल्यावरून फ्रँचायझींना लक्ष्य केले आहे.
आकाश चोप्रा त्याच्या समालोचनाच्या अप्रतिम कौशल्यामुळे प्रसिध्द आहे. क्रिकेटच्या मैदानावर काही खास कामगिरी करता न आलेला चोप्रा समालोचनाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आताच्या घडीला तो जिओ सिनेमासाठी समालोचन करत आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात परदेशी खेळाडूंवर लागलेली विक्रमी बोली पाहून त्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आकाश चोप्राचा संताप
आकाश चोप्राने विराटचा दाखला देत म्हटले, "इंग्लंडच्या सॅम करनला विराट कोहलीपेक्षा अधिक पैसे मिळत आहेत, हे तर कलियुग आले आहे. मला वाटते की, परदेशी खेळाडूंसाठी एक वेगळी पर्स असावी. ही इंडियन प्रीमिअर लीग आहे. जसप्रीत बुमराहपेक्षा अधिक मानधन घेण्यास मिचेल स्टार्क पात्र नव्हता. पण तरीदेखील त्याच्यावर एवढा पैसा ओतला गेला. ही खरंच चिंतेची बाब आहे.
मिचेल स्टार्कवर तब्बल २४.७५ कोटींचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.
Web Title: After Australia's Mitchell Starc received a record Rs 24.75 crore in the IPL 2024 Auction, Akash Chopra said he did not deserve more than Jasprit Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.