नवी दिल्ली : तुम्ही कितीही कमवा, पण परेदशात जाण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, हे तुम्हालाही माहिती नसेल. पण 12 वर्षांच्या चिमुरड्याने परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि तेदेखील फक्त कचरा उचलून. आता या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे आणि काही दिवसांमध्येच घडलेली आहे.
या 12 वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी एक अट ठेवली होती. त्यानुसार या चिमुरड्याला ठराविक रक्कम जमा करायची होती. त्यामुळे त्याने सलग चार वर्षे कचरा उचलला आणि भरपूर पैसे कमावले. त्याचबरोबर वडिलांची अटही पूर्ण केली आणि तो थेट परदेशवारीसाठी रवाना झाला.
नेमके प्रकरण आहे तरी काय...मॅक्स वेट हा 12 वर्षांचा मुलगा क्रिकेटचा चाहता आहे. 2015 साली ऑस्ट्रेलियाने मायदेशामध्ये विश्वचषक जिंकला होता. हा सामना मॅक्सने स्टेडियममध्ये बसून पाहिला होता. त्याचवेळी त्याने एक गोष्ट मनाशी निश्चित केली. चार वर्षांनंतर अॅशेस मालिका इंग्लंडमध्ये होणार होती. ही मालिका आपण बघायची, असे त्याने ठरवले आणि आपल्या बबांना सांगितले. यावेळी त्याच्या वडिलांनी एक अट ठेवली. जर तू तीन वर्षांमध्ये पंधराशे ऑस्ट्रेलियन डॉलर जमा केलेस तर तुला मी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाचे सामने पाहायला घेऊन जाईन. आता हे पैसे कसे जमा करायचे, हा प्रश्न मॅक्सपुढे होता. कारण तो 18 वर्षांपेक्षा लहान असल्यामुळे त्याला नोकरी करता येत नव्हती. त्यावेळी त्याने एक शक्कल लढवली. आपल्या घराच्या बाजूच्या बऱ्याच लोकांच्या घरातील कचरा जमा करण्याचे काम त्याने करायला सुरुवात केली. प्रत्येक घरातून त्याला एक ऑस्ट्रेलियन डॉलर मिळायचा. थेंबा-थेंबाने तळे साचवत त्याने पंधराचे ऑस्ट्रेलियन डॉलर्स जमवले आणि अट पूर्ण करत त्याने पालकांसह इंग्लंड गाठले.
आता तर मॅक्सने ऑस्ट्रेलियाच्या संघातही एंट्री केली आहे. कारण त्याने स्टीव्ह वॉ, जस्टीन लँगर आणि नॅथन लायन यांच्याबरोबर बसून सामने पाहिले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटीन्सनने त्याला आपली स्वाक्षरी असलेले टी-शर्टही दिले आहे.