भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा पुन्हा एकदा वादात अडकला आहे. गोव्यातील निचोनाला गावात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अजय जडेजाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागला आहे. या गावच्या सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी २८ जूनला ही घटना घडल्याचे सांगितले. उत्तर गोव्यातील अल्डोना गावात जडेजाचा बंगला आहे आणि त्या बंगल्याशेजारीच निचोनाला गाव येते.
KKRच्या फलंदाजाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी; अवघ्या १५ चेंडूंत चोपल्या ७२ धावा, जाणून घ्या किती चेंडूत पूर्ण केले शतक!
''आमचं गाव कचऱ्याच्या समस्येनं हैराण आहे. गावाबाहेरूनही येथे कचरा फेकला जातो, त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी आम्ही काही युवकांची नियुक्ती केली आहे. दोषींना पकडण्यासाठी त्यांना पुरावेही गोळा करण्यास सांगितले आहे,''असे सरपंचांनी सांगितले.
''गोळा केलेल्या कचऱ्यात अजय जडेजाच्या नाव असलेली काही बिलं आम्हाला सापडली. तेव्हा आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि गावात कचरा न फेकण्याचे सांगितले. तेव्हा जडेजानं जो काही दंड आहे, तो भरण्याची तयारी दाखवली. त्यानुसार त्यानं दंड भरला. आमच्या गावात सेलिब्रेटी राहतात याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु त्यांनी नियमांचं पालन करायला हवं,''असेही सरपंचांनी स्पष्ट केले.
जडेजानं टीम इंडियाकडून १५ कसोटी व १९६ वन डे सामन्यांत अनुक्रमे ५७६ व ५३५९ धावा केल्या आहेत. त्यात सहा शतकं व ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. १९९७साली श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ११९ धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानं झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजविरुद्धही शतक झळकावले आहेत.