भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीच्या नावावर असलेले विक्रम मोडणे, सहज शक्य नाही. पण, शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची यष्टिरक्षक अॅलिसा हिली हीनं MS Dhoniच्या नावावर असलेला रेकॉर्ड मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी ( पुरुष व महिला क्रिकेट) मिळवण्याचा विक्रम हिलीनं स्वतःच्या नावावर केला. 30 वर्षीय हिलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात हा विक्रम नावावर केला.
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघानं प्रथम फलंदाजी करताना 128 धावाच केल्या. अॅमी सॅटरवेट ( 30) आणि सुझी बेट्स ( 22) यांनी किवींकडून चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या डेलिसा किम्मिन्स आणि जॉर्जिया वारेहन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन महिला संघानं हे लक्ष्य 16.4 षटकांत 2 बाद 129 धावा करून बाजी मारली. हिलीनं 17 चेंडूंत 33 धावा कुटल्या. बेथ मूनी ( 24), मेग लॅनिंग ( 26*) आणि राचेल हायनेस ( 40*) यांनी ऑस्ट्रेलियाकडून दमदार खेळ केला.
हिलीनं 99 ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 92 बळी टिपले आहेत. तिनं धोनीचा 97 सामन्यांतील 91 बळींचा विक्रम मोडला. इंग्लंडची सारा टेलर ही या क्रमवारीत 74 बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राचेल प्रिस्ट ( 72) आणि मेरीसा अॅग्यूलेईरा ( 70) यांचा क्रमांक येतो. यानंनतर दानेश रामदीन ( 63) आणि मुश्फीकर रहीम ( 61) या पुरुष यष्टीरक्षकांचा क्रमांक येतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टीपण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरच्या नावावर आहे. त्यानं 467 सामन्यांत 998 बळी टिपले आहेत. त्यानंतर अॅडम गिलख्रिस्ट ( 396 सामने व 905 बळी) आणि धोनी ( 538 सामने व 829 बळी) यांचा क्रमांक येतो.