नेपिअर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : सध्याच्या घडीला भारताच्या दोन खेळाडूंचे नाव चर्चेत आहे. पहिला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दुसरा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. पण या दोघांनाही मागे टाकत अंबाती रायुडूने एक विक्रम रचला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या सामन्यात रायुडूला 23 चेंडूंमध्ये 13 धावा करता आल्या. ही धावसंख्या फार काही मोठी नाही. पण या 13 धावा करत रायुडूने धोनी आणि कोहली यांना मागे टाकले आहे.
धावांचा पाठलाग करण्यात आणि मॅच फिनिशर अशी बिरुदावली धोनी आणि कोहली मिरवत आहेत. पण धावांचा पाठलाग करताना सर्वात चांगली सरासरी आहे ती रायुडूची. धावांचा पाठलाग करताना रायुडूची सरासरी 103.33 एवढी आहे. यानंतर दुसरा क्रमांक आहे तो धोनीचा (103.07). कोहली (96.94) या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.