Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्स याचं (Andrew Symonds Death) शनिवारी अपघाती निधन झालं. सायमंड्सच्या मृत्यूनंतर जगभरातील क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही सायमंड्सला ट्विटरवरून श्रद्धांजली दिली, पण लक्ष्मणने यात एक चूक केली आणि त्यामुळे त्याला चाहत्यांची माफीही मागावी लागली.
ऑस्ट्रेलियासाठी दमदार कारकीर्द घडवणारा अँड्र्यू सायमंड्स IPL मध्येदेखील डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता. त्यामुळेच त्याचे भारतातही असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांसाठी रविवारची सकाळ धक्कादायक ठरली. सायमंड्सच्या अपघाती मृत्यूमुळे क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याला श्रद्धांजलीपर ट्वीट करताना लिहिले, "भारतात आजची सकाळ एका धक्कादायक बातमीने झाली. माझ्या प्रिय मित्रा, देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. खरंच ही घटना वाईट आहे." लक्ष्मणने आपल्या भावना व्यक्त केल्या, पण इमोजी टाकण्याच्या नादात मोठी चूक केली. त्याने दोन इमोजी ट्वीट केल्या, यातली पहिली इमोजी तुटलेल्या हृदयाची होती, तर दुसरी रडण्याची. यातली दुसरी इमोजी रडण्याची असली तरी ती आनंदाश्रूंची होती. यावरून चाहत्यांनी लक्ष्मणला इमोजी बदलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यानेही चूक मान्य करत माफी मागितली आणि इमोजीबाबत स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियासाठी सायमंड्सने २६ कसोटी, १९८ वन डे आणि १४ टी२० सामने खेळले.