ठळक मुद्देअर्जुन हा खेळाडू म्हणून आहे तरी कोण, असा प्रश्न विचारायची वेळ सध्या आली आहे.
महान लेखक विल्यम शेक्सपिअर यांचं एक वाक्य आहे, नावात काय ठेवलंय? पण, भारतातील युवा क्रिकेटचा विचार केल्यास, सध्याच्या घडीला नावातच सारं काही असल्याचं दिसतंय. अर्जुन सचिन तेंडुलकर, या मिसरुडंही न फुटलेल्या क्रिकेटपटूचं उदाहरण घ्या. त्याचे वडिल महान क्रिकेटपटू होते, म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातंय. त्याने एका फलंदाजाला काय बाद केलं, लोकांना विश्वविक्रम झाल्यासारखं वाटलं. यामध्ये प्रसारमाध्यमंही तेवढीच जबाबदार आहेत. एक बळी मिळवणाऱ्या अर्जुनचा एवढा गवगवा केला की त्या हिमा दासलाही तेवढं महत्त्व दिलं नाही. नेमकं हे काय चाललंय आणि कशासाठी, की कोण हे करवून घेतंय, या गोष्टीचा शोध घ्यायला हवा.
महान खेळाडूचा मुलगाही तेवढ्याच उंचीवर जाईल, असं काहीच नसतं. सचिन एक फलंदाज म्हणून महान होता. पण ते दडपण अर्जुनवर कशाला? सुनील गावस्कर महान फलंदाज होते, त्यांचा मुलगा किती आणि काय खेळला, हे न सांगणेच बरे. सचिनने जेव्हा विनोद कांबळीबरोबर विक्रमी भागीदारी रचली तेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. अर्जुनला तर अजून बराच पल्ला गाठायचाय. त्यापूर्वीच त्याच्यामध्ये देव बघण्याचा अट्टाहास कशासाठी?
काही वर्षांपूर्वीची एक गोष्ट. अर्जुनची मुंबईच्या 14-वर्षांखालील संघात निवड झाली होती. आपली निवड झाली हे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्या खेळाडूंना कळत असतं. पण या संघात अर्जुनची निवड झाली हे त्याला सांगण्यासाठी एक निवड समिती सदस्य त्याच्या घरी गेला होता. हे क्रिकेटसारख्या खेळाचं दुर्दैव नाही का? एकीकडे हजार धावा करणाऱ्या मुलाला कमी लेखायचं. मैदानच लहान होते, प्रतिस्पर्धी वयाने छोटे होते, असे मुद्दे उकरून काढायचे, का? त्याचे वडील रिक्षाचालक आहेत म्हणून? आणि दुसरीकडे अर्जुनला डोक्यावर घेऊन मिरवायचं, हा कुठला अजब न्याय?
भारतीय संघाचे प्रशिक्षक त्याला मार्गदर्शन करणार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंबरोबर तो सराव करणार, वडिलांच्या अखेरच्या सामन्याला त्याला बॉल बॉय म्हणून प्रवेश देणार, हे सारं कशासाठी. अर्जुन हा खेळाडू म्हणून आहे तरी कोण, असा प्रश्न विचारायची वेळ सध्या आली आहे. कारण सचिन त्याच्या गुणवत्तेवर मोठा झाला, तसं अर्जुन झाला तर आनंदच आहे. पण गुणवत्ता सिद्ध करण्यापूर्वी फक्त वडिलांच्या नावावर त्याला हे सारं मिळत असेल तर तो करंटेपणा ठरेल.
एका फलंदाजाला बाद केल्यावर प्रसारमाध्यमांनी त्याची मोठी बातमी केली. ठीक. मग आता तो शून्यावर बाद झाला हेदेखील ठसठशीतपणे मांडणार का? हा मोठा प्रश्न आहे. ते करता येत नसेल तर आयुष बदोनीने त्याच सामन्यात नाबाद 185 धावा केल्या, त्याचं किती कौतुक व्हायला हवं, याचाही विचार झाला पाहिजे.
अर्जुन तेंडुलकर हा एक युवा खेळाडू आहे, एवढाच त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असायला हवा. तसं जर होत नसेल तर त्याच्यासहित अन्य युवा खेळाडूंवरही तो अन्याय ठरेल. अर्जुनला स्वत:ची छाप पाडू द्या. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना धारेवर धरू द्या. त्याची एक गोलंदाज म्हणून दहशत निर्माण व्हायला हवी. पण जर असं झालं नाही तर भारतीय संघातही अर्जुनला सचिनच्या देवत्त्वाच्या वशिल्यावर संधी देणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
Web Title: Arjun Sachin Tendulkar ... everything is in the name ?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.