ब्रिस्बेन - अॅशेस मालिकेत कर्णधार स्टिव्हन स्मिथने शानदार शतक झळकवून ऑस्ट्रेलियाला इंग्लंडवर आघाडी मिळवून दिलीच पण त्याचबरोबर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही एक विक्रम मोडला. स्मिथने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील वेगवान 21 शतकांचा विक्रम मोडला. स्मिथने आज इंग्लंडविरुद्ध 21 वे शतक झळकावले पण त्याने 105 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली तेच सचिनने 110 डावांमध्ये 21 शतके झळकवली होती.
स्मिथचा करीयरमधील हा 57 वा कसोटी सामना आहे. वेगवान 21 कसोटी शतके झळकवणा-या फलंदाजांमध्ये स्मिथ आता तिस-या आणि सचिन चौथ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेनमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 302 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 328 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला 26 धावांची छोटी आघाडी मिळाली. कर्णधार स्मिथने नाबाद (141) धावा फटकावल्या.
वेगवाने 21 कसोटी शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी फक्त 56 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. दुस-या स्थानावर भारताचेल लिटील मास्टर सुनिल गावसकर आहेत. त्यांनी 98 कसोटी डावांमध्येच हा टप्पा गाठला होता. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ पाचव्या स्थानावर आहे. त्याने 120 डावात 21 शतके झळकवली होती.