- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)दुस-या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २३९ धावांनी लोळवून आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळविला. यावरून भारताने कशाप्रकारे दबदबा राखला, याची कल्पना येते. पण माझ्या मते, श्रीलंका पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे भासत आहे. त्यांच्यात कोणती नवी गुणवत्ता दिसून आली नाही, तसेच कोणताही जोश दिसला नाही. त्यामुळे येथे आलेला संघ सहजपण पराभूत होत असल्याचे पाहून खूप निराशा होत आहे. तसेच, भारतीय संघाची कामगिरी खूप उंचावल्याने श्रीलंकेची ही अवस्था झाली आहे. या सामन्यात सर्व गोलंदाजांनी बळी घेतले. ईशांत शर्मा, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि खासकरून रविचंद्रन आश्विन यांनी छाप पाडली. शिवाय, पुनरागमन करून शतक झळकावणाºया मुरली विजयने स्वत:ला सिद्ध केले. त्यामुळे आता त्याला बाहेर कसे बसवणार, हा नवा पेच निर्माण झाला आहे. तसेच, चेतेश्वर पुजारा जबरदस्त खेळला. एकदा का त्याचा जम बसला, की त्याला बाद करणे कठीण असते. रोहित शर्मानेही शानदार पुनरागमन करीत शतक ठोकले. शेवटी विराट कोहलीने आपला दर्जा दाखविला. पाचवे द्विशतक झळकावताना त्याने जागतिक क्रिकेटचे सर्वोच्च शिखर गाठण्याच्या दिशेने सुरू असलेली घोडदौड कायम राखली.आश्विनचे विशेष कौतुक करावे लागले. त्याने कारकिर्दीतील ३०० बळी केवळ ५४ कसोटी सामन्यांत पूर्ण करताना नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या वेळी काहींनी टीकाही केली, की आश्विनला बहुतेक बळी हे भारतीय खेळपट्ट्यांवर मिळाले आहेत. पण माझ्या मते, जगातील प्रत्येक गोलंदाजासाठी घरचे मैदान खूप फायदेशीर ठरते. याआधी सर्वांत कमी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विक्रम रचलेल्या आॅस्टेÑलियाच्या डेनिस लिलीकडे पाहिले तर लक्षात येईल, की त्यांना उपखंडात बळी मिळाले नाहीत. शेन वॉर्नला भारतात विशेष यश मिळाले नाही. अशी खूप खेळाडूंची उदाहरणे देता येतील. त्यामुळे आश्विनने घेतलेल्या बळींना महत्त्व नाही, असे म्हणणे खूप मोठा गैरसमज असेल. याउलट, आश्विनचे कौतुक करावे लागेल की, तो सातत्यपूर्ण कामगिरी करीत एकामागोमाग एक सामने जिंकून देत आहे. अजूनही त्याने वयाची ३१-३२ वर्षे पूर्ण केलेली नसल्याने भविष्यात हा गोलंदाज खूप मोठा पराक्रम गाजवणार याची मला खात्री आहे. सध्या भारतीय गोलंदाजांच्या नावावर जे काही विक्रम आहेत, ते नक्कीच आश्विन आपल्या नावावर करेल, यात शंका नाही.विराट कोहलीविषयी सांगायचे म्हणजे, त्याने एक मुद्दा घेतला होता अतिरिक्त क्रिकेटचा. न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने हा मुद्दा घेतला होता. लंकेविरुद्ध खेळताना त्याने म्हटले, की आगामी आफ्रिका दौºयाच्या दृष्टिकोनातून खेळपट्टी चांगली असावी. कारण तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे माझ्या मते, त्याने खूप मोठा मुद्दा उपस्थित केला होता. आता लंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत तो खेळणार नाही. अनेक माजी खेळाडूंसह महेंद्रसिंह धोनीनेही कोहलीचे समर्थन केले. त्यामुळे बीसीसीआयला कळून चुकले आणि ‘सीओए’ विनोद राय यांनी स्पष्ट केले, की दिल्ली येथील तिसरी कसोटी झाल्यानंतर भविष्यातील वेळापत्रकाबाबत कोहली, धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह बैठक घेण्यात येईल. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये हा खूप मोठा बदल आल्याचे मला वाटते. आतापर्यंत बीसीसीआयच्या निर्णयाप्रमाणे सर्व काही होत होते; पण आता खेळाडूही बोर्डाला आपल्या निर्णयानुसार बदल करण्यास भाग पाडत आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भविष्यात आश्विन खूप मोठा पराक्रम गाजवणार
भविष्यात आश्विन खूप मोठा पराक्रम गाजवणार
दुस-या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २३९ धावांनी लोळवून आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळविला. यावरून भारताने कशाप्रकारे दबदबा राखला, याची कल्पना येते. पण माझ्या मते, श्रीलंका पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे भासत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 1:52 AM