दुबई, आशिया चषक 2018 : सध्याच्या घडीला आशिया चषकासाठी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. इंग्लंडच्या दौऱ्यानंतर विराट कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोहितकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. पण आता आगामी विश्वचषकासाठी कोहलीएवजी रोहितकडे कर्णधारपद सुपूर्द करण्यात यावे का, या चर्चेला सुरुवात झाली आहे. रोहितने जर आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले तर विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून त्याच्या नावाचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागू शकतो.
एक कर्णधार म्हणून कोहलीला महत्त्वाच्या मालिकांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारतामध्ये कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताची चांगली कामगिरी झाली असली तरी त्याला विदेशातील मालिकांमध्ये एक कर्णधार म्हणून चांगली कामिगरी करता आलेली नाही.
विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कोहली कर्णधार म्हणून अपयशी ठरला होता. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताला एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत तर भारतीय संघावर इंग्लंडने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या इंग्लंडमधील कामगिरीच्या जो़रावर कोहलीकडून कर्णधारपद काढून ते रोहितकडे देण्यात यावे, अशी चर्चा सुरु झाली आहे.