David Warner loses Baggy Green cap: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्याने या आधीच कसोटी क्रिकेटला रामराम करणार असल्याचे सांगितले होते. सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. हा सामना वॉर्नरच्या कारकिर्दीतील देखील शेवटचा सामना आहे. वन डेमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर वॉर्नरने एक व्हिडीओ शेअर केला असून भावनिक आवाहन केले आहे. खरं तर वॉर्नरच्या बॅकपॅकची चोरी झाल्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर नाराज असल्याचे दिसले.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत वॉर्नरने त्याच्या बॅकपॅकची चोरी झाल्याची माहिती दिली. तसेच ज्यांनी ही बॅग चोरी केली आहे त्यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूने भावनिक आवाहन करत बॅग परत करण्याची विनंती केली आहे. वॉर्नरने भावनिक आवाहन करताना म्हटले, "दुर्दैवाने कोणीतरी माझी बॅकपॅक गायब केली आहे, त्यामध्ये महत्त्वाचे साहित्य आहे. त्यात माझ्या मुलींच्या भेटवस्तूही ठेवल्या होत्या. माझी बॅगी ग्रीन कॅपही या बॅकपॅकमध्ये होती. याची चोरी होणं हे माझ्यासाठी भावनिक आहे. ही गोष्ट मला माझ्या हातात परत घ्यायला आवडेल. मला हे घालून मैदानात जायचे आहे. ज्याने कोणी ही बॅग नेली आहे त्याला सांगू इच्छितो की, तुम्हाला खरोखर बॅकपॅक हवी असल्यास मला तसे सांगा... माझ्याकडे एक अतिरिक्त आहे, जी मी नक्की देईन. तुम्ही माझी बॅगी ग्रीन कॅप परत केल्यास मी तुम्हाला बॅकपॅक आनंदाने देईन."
वॉर्नरचा वन डे क्रिकेटला रामराम डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले.