साऊथम्पटन : मिशेल मार्शच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या व अखेरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच गडी राखून मिळवत टी-२० क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
ऑस्ट्रेलिया पुढे विजयासाठी १४६ धावांचे लक्ष्य होते. मार्शच्या नाबाद ३९ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा तीन चेंडू राखून पूर्ण केल्या. या मालिकेत इंग्लंडने सुरुवातीचे दोन सामने जिंकत २-१ ने सरशी साधली. इंग्लंडने रविवारी दुसरा सामना जिंकत अव्वल स्थान पटकावले होते, पण दोन दिवसामध्ये त्यांना ते स्थान गमवावे लागले.
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉन बेयरस्टॉने संथ सुरुवातीनंतर ४४ चेंडूंमध्ये ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यांच्या संघाला ६ बाद १४५ धावांची मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. कर्णधार अॅरोन फिंच (३९) आणि मार्कस स्टोइनिस (२६) यांच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच एकवेळ १ बाद ७० अशी धावसंख्या होती, पण मधली फळी गडगडल्यामुळे त्यांची १३ व्या षटकात ५ बाद १०० अशी अवस्था झाली होती.
लेग स्पिनर आदिल राशिद (२१ धावांत ३ बळी) याने फिंच, ग्लेन मॅक्सवेल (६) आणि स्टीव्हन स्मिथ (३) यांना बाद करीत आॅस्ट्रेलियाचा डाव अडचणीत आणला. त्यानंतर मार्श व एस्टन एगर (नाबाद १६) यांनी ४६ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला लक्ष्य गाठून दिले. आता उभय संघांदरम्यान शुक्रवारपासून तीन वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था)