ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. पर्थ येथे खेळवण्यात आलेल्या डे नाइट कसोटीच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियानं 296 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाच्या दिशेनं वेगानं वाटचाल केली आहे.
मार्नस लॅबुश्चॅग्नेनं पहिल्या डावात 240 चेंडूंत 18 चौकार व 1 षटकार खेचून 143 धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारून दिली. ट्रॅव्हीस हेड ( 56), डेव्हीड वॉर्नर ( 43) आणि स्टीव्ह स्मिथ ( 43) यांनी त्याला योग्य साथ दिली. ऑसींच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या उत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 166 धावांवर गडगडला. रॉस टेलर ( 80) वगळता किवी फलंदाजांनी निराश केलं. मिचेल स्टार्कनं 5 विकेट्स घेतल्या.
किवींना फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलिया पहिल्या डावातील 251 धावांच्या आघाडीसह पुन्हा मैदानावर उतरले. जो बर्न्स ( 53) आणि मार्नस लॅबुश्चॅग्ने ( 50) यांनी अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियानं दुसरा डाव 9 बाद 217 धावांवर घोषित केला. किवींच्या टीम साऊदीनं पाच, तर नील वॅग्नरनं तीन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेल्या 268 धावांचा पाठलाग करताना किवींचा डाव पुन्हा गडगडला. मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेत किवींचा दुसरा डाव 171 धावांत गुंडाळला.
या विजयासह ऑस्ट्रेलियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आणखी गुणांची कमाई केली. या गुणतालिकेत टीम इंडिया 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियानं 7 पैकी 7 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियानं 8 सामन्यांत 5 विजयासह 216 गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली आहे.