AUS vs PAK Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला यजमानांकडून सलग दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. २८ वर्षांची परंपरा कायम ठेवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शुक्रवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना संपल्यानंतर मैदानावर एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळाले. खरं तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपले शूज एका छोट्या चाहत्याला देऊन सर्वांची मनं जिंकली. स्टार्कने चाहत्याला वचन दिले होते की, जर सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानचा सर्व संघ तंबूत पाठवला तर तो त्याला त्याचे शूज भेट म्हणून देईल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा दुसरा डाव गुंडाळला आणि कसोटी सामना जिंकला. सामना संपताच स्टार्कने लगेचच चाहत्याकडे धाव घेतली आणि त्याला भेट दिली. तसेच स्टार्कला चिमुकल्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह देखील आवरला नाही. सर्वप्रथम त्याने शूजवर सही केली आणि नंतर पिवळी टोपी परिधान केलेल्या या छोट्या क्रिकेट चाहत्याला शूज सुपूर्द केले. यावेळी इतर अनेक चाहतेही दिसले. स्टार्कने या सर्वांसोबत सेल्फीही काढला.
कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ आणि दुसऱ्या डावात २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात २६४ आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या. खरं तर पाकिस्तानला मागील २८ वर्षांमध्ये एकदाही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने १० बळी घेतल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी ३१७ धावांची गरज होती. मात्र, शेजाऱ्यांना सर्वबाद केवळ २३७ धावा करता आल्या. या डावात कर्णधार शान मसूद सर्वाधिक ६० धावा करून बाद झाला. बाबर आझमने ४१ धावांची सावध खेळी केली. तर, रिझवानने ३५ धावांचे योगदान दिले. या मालिकेतील पाकिस्तानी संघाचा सलग दुसरा पराभव झाला अन् २८ वर्षांची परंपरा कायम राहिली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने दुसऱ्या डावातही कमाल केली. त्याने १८ षटकात ४९ धावा देत ५ बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे कमिन्सने दोन्ही डावात ५-५ बळी घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला.