सिडनी - क्रिकेटच्या दुनियेत मेलबर्न आणि अॅडलेड ओव्हल या ऑस्ट्रेलियन स्टेडिअम्सचं एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला या मैदानांवर खेळण्याची इथे शतक झळकावण्याची इच्छा असते. याच अॅडलेड ओव्हलच्या व्यवस्थापनाने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा विवाहसोहळा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
भारतीय माध्यमांमध्ये 'विरूष्का' म्हणून लोकप्रिय असलेल्या या जोडीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. विरुष्काने डेस्टिनेशन वेडिंग प्लान केल्याची चर्चा आहे. अॅडलेड ओव्हलवर विरुष्काने विवाहबद्ध व्हावे अशी स्टेडिअम व्यवस्थापनाची इच्छा आहे. अॅडलेड ओव्हलवर विराट-अनुष्काचा विवाहसोहळा आमच्यासाठी एका रोमांचक अनुभव असेल. अॅडलेडवर नेहमीच सर्वोत्तम प्रदर्शन करणा-या विराटला इथे आणखी आनंददायक आठवणी मिळतील असे या ऐतिहासिक मैदानाचे सीईओ अँड्रयू डॅनियल म्हणाले.
अॅडलेवर खेळताना विराटने तीन शतके झळकावली आहेत. त्याची टी-20 मधील नाबाद (90) धावांची सर्वोत्तम खेळी सुद्धा याच मैदानावरील आहे. अॅडलेडवर खेळताना विराटने 89च्या सरासरीने आठ डावात 624 धावा फटकावल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतेच कोटयावधी रुपये खर्च करुन या 146 वर्षीय जुन्या स्टेडिअमचे नुतनीकरण केले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या अॅशस मालिकेतील दुस-या कसोटी सामन्यासाठी 2 लाख प्रेक्षक एकाचवेळी स्टेडिअमवर उपस्थित असल्याने हे स्टेडिअम चर्चेमध्ये आले होते.
विराट-अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा असताना गुरूवारी रात्री उशिरा अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का तिच्या कुटुंबीयांसह इटलीला जात असल्याची चर्चा आहे.
अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत गुरूवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का तिची आई आशिमा शर्मा आणि वडील अजय कुमार शर्मा यांच्यासोबत दिसली. त्यावेळी मोठा भाऊ कर्णेश शर्माही त्यांच्यासोबत होता. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळावर फक्त अनुष्का आणि तिचे कुटुंबीयच दिसले. परंतु विराट त्यांच्यासोबत नव्हता.
इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.