David Warner retires from ODI Cricket: नवीन वर्षाच्या सुरूवातीला क्रिकेट विश्वाला धक्का देत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वन डेमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. या आधीच त्याने कसोटी क्रिकेटला रामराम करणार असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वॉर्नर शेवटच्या वेळी पांढऱ्या जर्सीत दिसेल. तो शेजाऱ्यांविरूद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. वॉर्नरने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या स्फोटक खेळीसमोर भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज वॉर्नरची डोकेदुखी वाढवायचा. याची कबुली खुद्द वॉर्नरने दिली आहे.
वॉर्नरने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तुला जगातील सर्वात घातक गोलंदाज कोणता वाटतो? या प्रश्नावर बोलताना वॉर्नरने म्हटले, "तो गोलंदाज डेल स्टेन होता यात शंका नाही. मला २०१६-१७ मधील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना आजही आठवतो. तेव्हा मला आणि शॉन मार्शला ४५ मिनिटे खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. शॉनने मला सांगितले की, मी कोणत्याच चेंडूवर पुल शॉट मारू शकत नाही. डेल स्टेनचा कसा सामना करायचा याची भीती वाटते."
तसेच त्या सामन्यात स्टेनने घातक गोलंदाजी करून आम्हाला घाम फोडला होता. त्या सामन्यात माझ्या खांद्याला दुखापत देखील झाली होती. स्टेन एक मजबूत प्रतिस्पर्धी होता, जो डावखुऱ्या फलंदाजांची अधिकच डोकेदुखी वाढवायचा. त्याचपद्धतीने मिचेल स्टार्क डावखुऱ्या फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो, असेही वॉर्नरने सांगितले.
वॉर्नरची वन डे कारकिर्द
डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले.
Web Title: Australia's David Warner has named former South African Dale Steyn as the toughest bowler after announcing his retirement from ODI cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.