नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सध्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यातही त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. या सामन्यात धोनीला केवळ 20 धावा करता आल्या. ओबेद मॅक्कायच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. धोनीच्या या सातत्याने होणाऱ्या निराशाजनक कामगिरीमुळे सामान्य चाहते नाराज झाले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने धोनीला निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळातील मंत्री बाबुल सुप्रियो यांनी धोनीच्या निराशाजनक कामगिरीवर नाराजी प्रकट केली आहे. त्यांनी धोनीला निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला आहे. मात्र, हा सल्ला देताना सुप्रियो यांनी स्वतःला धोनीचा सर्वात मोठा फॅन असल्याचे सांगितले. तरिही ज्या पद्धतीने धोनी बाद झाला ते स्वीकाहार्य नाही, असेही सुप्रियो म्हणाले.