Join us  

अरेरे! दक्षिण आफ्रिकेवर फारच वाईट परिस्थिती, २४ तासांत हरले २ वनडे सामने

दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानातच स्वीकारावा लागला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 6:05 PM

Open in App

South Africa lost ODI : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप कठीण मानले जाते. परंतु या संघाने २४ तासांत घरच्या मैदानावर दोन सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पहिला पराभव जोहान्सबर्गमध्ये झाला आणि दुसरा पराभव ९५७ किलोमीटर दूर इस्ट लंडनमध्ये झाला. दक्षिण आफ्रिकेचा पुरुष आणि महिला संघ दोघे वाईटरित्या पराभूत झाले. ही बाब फारच धक्कादायक ठरली. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचा टीम इंडियाने 8 विकेट्सने पराभव केला, तर महिला संघाचा इस्ट लंडन शहरात बांगलादेशच्या महिलांकडून 119 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला.

भारताने उडवला दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेला पहिला पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांनी एडन मार्करामच्या संघाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ २७ षटकेच मैदानावर राहू शकला आणि त्याची धावसंख्या केवळ 116 धावा होती. अर्शदीप सिंगने ५ तर आवेश खानने ४ बळी घेतले. यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला असला तरी यानंतर साई सुदर्शनने नाबाद ५५ आणि श्रेयस अय्यरने ५२ धावा करत टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला.

बांगलादेशने केला दक्षिण आफ्रिका महिला संघाचा पराभव

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला इस्ट लंडन शहरात दारूण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २५० धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १३१ धावांत गडगडला. बांगलादेशची फलंदाज मुर्शिदा खातूनने नाबाद ९१ धावा केल्या तर गोलंदाजीत नाहिदा अख्तरने ३ बळी घेतले. बांगलादेश संघाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाद. आफ्रिकाबांगलादेश