ढाका - सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. बंगालमध्ये नवरात्रौत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र फाळणीनंतर बांगलादेशमध्ये गेलेल्या बंगाली भागात हिंदू बांधवांना नवरात्रौत्सव साजरा करणे फार कठीण बनले आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील स्टार क्रिकेटपटू लिटन दास याने नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्याला कट्टरतावाद्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला धर्मपरिवर्तन करण्याचा सल्ला दिला.
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी लिटन दास याने फेसबूकवरून नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच्या या पोस्टवर कट्टरतावाद्यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषेमध्ये कमेंट्स केल्या आहेत. अनेक जणांनी त्याच्यासाठी अपशब्द वापरले आहेत. तसेच त्याला धर्म बदलून इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अनेक मुस्लिम समर्थकांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. याआधी जन्माष्टमी दिवशी शुभेच्छा दिल्यानंतरही लिटन दास याला ट्रोल करण्यात आले होते. त्याच्या पोस्टवर आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती.
दरम्यान, एका मुलाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याला त्याचा आवडता खेळाडू कोण असे विचारले असता त्याने त्याला सौम्य सरकार आवडत नाही, कारण तो हिंदू आहे, असं उत्तर दिलं होतं. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा बातम्या सातत्याने येत असतात. आता बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही अशा घटनांचा सामना करावा लागत आहे.