मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर दिलीप सरदेसाई या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले. २०१८-१९ च्या मोसमात केलेल्या शानदार कामगिरीने बुमराहने सर्वांनाच प्रभावित केले. वर्षातील सर्वोत्तम पुरुष आंतररष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून बुमराहला उम्रीगर, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेतल्याने बुमराहला सरदेसाई पुरस्काराने गौरविण्यात आले.
बुमराहने ६ कसोटी सामन्यांतून ३४ बळी मिळवताना तीनवेळा डावात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. बुमराहला २०१९ सालामध्येच अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजाराला सरदेसाई पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने८ सामन्यांत ३ शतक व २ अर्धशतकांसह ५२.०७ च्या सरासरीने ६७७ धावा केल्या.
महिलांमध्ये पूनम यादव हिला याच कामगिरीसाठी पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, तिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मानही देण्यात आला. या सोहळ्यादरम्यान भारताचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत आणि महिला संघाच्या माजी कर्णधार अंजूम चोप्रा यांना कर्नल सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे माजी कर्णधार असलेले श्रीकांत १९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या. निवृत्तीनंतर ते भारताचे मुख्य निवडकर्तेही राहिले होते. त्यांनीच २०११ साली निवडलेल्या भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात विश्वविजेतेपद पटकावले होते.
अंजूम चोप्रा १०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणार भारताची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिने आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांचे चार विश्वचषक व दोन टी२० विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. ‘विविध वयोगटापासून वरिष्ठ गटापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना, तसेच महान क्रिकेटपटूंना बीसीसीआय पुरस्कारांद्वारे आम्ही सन्मानित करतो,’ अशी प्रतिक्रीया बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.