मुंबई : न्यूझीलंड दौरा सुरु होण्यापूर्वीच भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंना आता न्यूझीलंडच्या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. यापुढे भारताचे खेळाडू दुखापतग्रस्त होऊ नये म्हणून बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. खेळाडूंना दुखापतींपासून वाचवण्यासाठी बीसीसीआयने आता एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
घरच्या मैदानावर श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांना पराभवाची चव चाखवल्यानंतर टीम इंडिया 2020 मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारतीय संघानं नववर्षातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेवर 2-0 असा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळपट्टींवर वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया आणखी तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. पण, या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवननं खांद्याच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली होती. त्यात तिसऱ्या सामन्यात अधिक भर पडली आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे धवनच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही साशंकता होती. अखेर धवनला किवी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. टीम इंडियासोबत धनव ऑकलंडला रवाना झाला नाही. धवननंतर आता भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
इशांतला रणजी करंडकातील सामना खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंच्या दुखापतींपासून वाचवण्यासाठी बीसीसीआयने एक आयडिया केली आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या काही खेळाडूंना आता रणजी करंडक स्पर्धेत न खेळण्याच्या सुचना दिल्या आहेत.
भारताचा कसोटी संघातील यष्टीरक्षक वृद्धिमान साहा हा इडन गार्डन्समध्ये होणाऱ्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळणार होता. पण सावधगिरीचा उपाय म्हणून बीसीसीआयने त्याला या सामन्यातून माघार घेण्याचे कळवले आहे.