नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्ड कर्णधार विराट कोहलीला घाबरते. इतकेच काय दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हेदेखील विराटपुढे खुजे असून केवळ अनिल कुंबळे हाच विराटला पुरून उरला, या शब्दात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त गुहा हे सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे काही महिने सदस्य राहिले आहेत. त्यांनी कोहलीला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज तर संबोधले, पण आपल्या एका लेखात कोहलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. बीसीसीआयसारखी संस्था कोहलीपुढे खुजी ठरली असल्याचे सांगून गुहा यांनी पुढे लिहिले, ‘कर्णधार या नात्याने विराटला स्वत:चे अधिकार आणि अहंकार या दोन्ही बाबतीत विनम्रपणा दाखविण्याची गरज आहे.’
भविष्यातील दौºयाचा कार्यक्रम निश्चित करण्याची बैठक होती त्या वेळी बोर्डाच्या कायदेशीर सल्लागाराने विराटचा सल्ला कुठल्याही स्थितीत घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले. बंगळुरूस्थित राष्टÑीय क्रिकेट अकादमीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुढे आला तेव्हा बीसीसीआय सीईओचे मत होते की, अकादमी कशी चालावायची यावर कोहलीचा शब्द पहिला आणि अखेरचा असेल.
भारताच्या क्रिकेट इतिहासात विराटला उत्तर देणारा केवळ अनिल कुंबळे हाच एकमेव असावा. रवी शास्त्रीला कोचिंगचा अनुभव नसताना त्याला जबाबदारी सोपविण्यात आली. विराटच्या तुलनेत शास्त्रीचे व्यक्तिमत्त्वदेखील खुजे ठरते.
प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीदेखील विराटपुढे स्वत:चे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता गहाण टाकली. असेच काहीसे क्रिकेट समितीने केले. सचिन, सौरभ, लक्ष्मण यांच्या समितीने टॉम मूडी यांच्याकडे डोळेझाक करीत रवी शास्त्रींची निवड केली.
हे दिग्गज कोहलीपुढे घाबरल्यासारखे वागले. त्यांनी संस्थेला एका व्यक्तीकडे गहाण टाकले. सध्या कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि प्रशासक हे सर्वजण कर्णधार विराट कोहलीपुढे दुय्यम ठरले आहेत.
गुहा यांनी उपस्थित केलेले टीकात्मक मुद्दे असे
बीसीसीआयमध्ये मी चार महिने काम केले. या काळात विराटने बीसीसीआयवर वर्चस्व मिळविल्याचे माझ्या लक्षात आले. बोर्डाचे अधिकारी सर्वाधिक लांगूलचालन विराटचेच करतात. खुषमस्करीची ही कृती मोदी यांचे कॅबिनेटमंत्री करतात त्यापेक्षा कैकपटींनी अधिक आहे. भारतीय कर्णधाराच्या अधिकारकक्षेत येत नसलेले मुद्देदेखील बोर्डाचे अधिकारी विराटच्या झोळीत टाकतात.
Web Title: BCCI's 'lottery' ahead of Kohli Surrender of Sachin, Ganguly and Laxman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.