भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नगर यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यामुळे मीरट येथील घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी भुवीच्या आईला कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं. भुवी व नुपूर यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नसल्याचे News 18नं दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. २१ मे रोजी त्याच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि उर्वरित सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मागील महिन्यात भुवीचे वडील किरण पाल सिंग यांचे कर्करोगामुळे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
भुवनेश्वर कुमार हा लंडन दौऱ्यासाठी निवडलेल्या संघाचा सदस्य नाही. भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यदप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जुलै महिन्यात भारताची दुसरी फळी श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे आणि त्या दौऱ्यावर भुवीची निवड होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी कदाचित भारतीय संघाचे नेतृत्व भुवीकडे सोपवले जाऊ शकते.
भुवीनं २१ कसोटी, ११७ वन डे व ४८ ट्वेंटी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करताना २४६ विकेट्स घेत्लया आहेत. २०१२ डिसेंबरमध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, परंतु बराच काळ त्याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर रहावे लागले.