पणजी : इंग्लंडचा ७८ धावांनी पराभव करीत श्रीलंकेने अंध क्रिकेट तिरंगी टि-२० मालिकेत शानदार सुरुवात केली. या सामन्यात श्रीलंकेच्या चंदना देसप्रियाने केलेली ९९ धावांची खेळी आकर्षक ठरली. तो शतकापासून वंचित राहिला. तोच सामनावीर ठरला. ही स्पर्धा क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया तसेच समर्थनम यांनी आयोजित केली आहे.
गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार एड हॉस्सेल याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्याच षटकामध्ये श्रीलंकेचा फलंदाज अजित सिल्व्हा याला बाद केले; परंतु नंतर चंदना देसप्रिया याने दमदार ९९ धावा करीत श्रीलंकेची धावसंख्या २६० वर नेली. हे आव्हान स्वीकारताना ५० धावांची भागीदारी करत इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी योग्य वेळी इंग्लंडचे फलंदाज बाद केले. त्यामुळे त्यांना १८२ धावांपर्यंत मजल मारता आली.
त्याआधी, भारत, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील अंध क्रिकेटपटूंच्या या तिरंगी मालिकेचे उद्घाटन गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष महंतेश जी. के., गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, आदी मान्यवर उपस्थित होते.