कॅनडा: सध्या कॅनडात ट्वेंटी -20 लीग सुरू आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. त्यातच सोमवारी झालेल्या विनिपेग हॉक्स विरूद्ध टोरंटो नॅशनलच्या सामन्यात ड्वेन ब्राव्हो व किरॅान पोलार्ड हे विंडिजचे खेळाडू मैदानातच एकमेकांना भिडल्याचे समोर आले.
असे झाले की, या सामन्यात ब्राव्होच्या गोलंदाजीवर पोलार्ड झेलबाद झाला. त्यानंतर ब्राव्हो आपल्या अंदाजात नेहमीप्रमाणे आनंद साजरा करत होता. मात्र पोलार्डने देखील ब्राव्होला त्याच्या बॅटने डिवचल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मडियावर व्हायरल होत आहे. ब्राव्हो विकेट घेतल्यावर नेहमीच त्याच्या स्टाइलने सेलिब्रेशन करतो. आयपीएलमध्येही त्याच्या डान्सची भूरळ अनेकांना पडली होती.
विनिपेग हॉक्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टोरांटो नॅशनल संघाने 19.5 षटकांत 7 बाद 216 धावा कुटल्या. चिराग सुरी व हेनरिच क्लासेन हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रॉड्रीगो थॉमस आणि युवराज सिंग यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीनं 77 धावांची भागीदारी करताना संघाला शतकी वेस ओलांडून दिली. युवीनं 173.08च्या स्ट्राईक रेटनं 26 चेंडूंत 45 धावा चोपल्या. त्यात चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. थॉमसने 47 चेंडूंत 65 धावा केल्या, तर किरॉन पोलार्डनं 247.62 च्या स्ट्राईक रेटनं 21 चेंडूंत 52 धावा कुटून काढल्या. त्यात 3 चौकार व 5 षटकार होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना विनिपेग संघाला ख्रिस लीन व शैमन अऩ्वर यांनी दमदार सुरुवात करून दिली. लीनने 48 चेंडूंत 89 धावा केल्या, तर अन्वरने 21 चेंडूंत 43 धावा केल्या. सन्नी सोहलने 27 चेंडूंत 58 धावा करताना संघाला विजयासमीप आणले. त्यानंतर विनिपेगच्या अन्य फलंदाजांनी विजयाचे सोपस्कार पार पाडले. युवराजनं 18 धावांत 1 विकेट घेतली. विनिपेगनं 3 विकेट्सने हा सामना जिंकला.