मुंबई : भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली होती. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. या अंतिम फेरीत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता तो अष्टपैलू इरफान पठाणने. पण आज मात्र इरफानने आज सर्व क्रिकेटच्या प्रकारांमधून निवृत्ती पत्करली आहे.
इरफानने वेगवान स्विंग वेगवान गोलंदाज म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इरफानने अविस्मरणीय कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इरफानने हॅट्ट्रिक घेतली होती.
भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इरफानला अष्टपैलू क्रिकेटपटू बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची बढतीही देण्यात आली होती. पण फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत असताना मात्र इरफानच्या गोलंदाजीवर परीणाम व्हायला लागला. इरफान चांगली स्विंग गोलंदाजी करायचा. पण त्याला पेस अकादमीमध्ये पाठवले आणि त्यानंतर त्याचा स्विंग हरवल्याचे पाहायला मिळाले.