वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याला कोरोना झाल्याची चर्चा काल दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती. त्यावर ब्रायन लारा याने गुरुवारी अखेर मौन सोडलं आणि सत्य समोर आणलं. मागील 24 तासांत लाराच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी नेटिझन्सच्या पोस्टचा पाऊस पडला. 2007मध्ये लारानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 22,358 धावा आणि 53 शतकं आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम 51वर्षीय लाराच्या नावावर आहे. त्यानं 2004मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही नाबाद 501 धावांच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यानं वॉर्विकशायर क्लबचे प्रतिनिधित्व करताना 1994साली डरहॅमक्लबविरुद्ध ही खेळी केली होती. शिवाय कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रमही लारानं केला आहे. त्यानं 2003मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रॉबीन पीटरसनच्या एका षटकात 28 धावा चोपल्या होत्या. लारानं 131 कसोटी व 299 वन डे सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 11,953 धावा तर वन डे त 10,405 धावा केल्या आहेत.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्तावर लारानं स्पष्ट मत मांडलं. त्यानं अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच झापले. त्यानं कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितले. त्यानं लिहिलं की,''माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या अफवा पसरल्या आहेत आणि त्याबाबत मला तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे आहे. हे वृत्त खोटं आहे आणि त्यामुळे आधीच कोरोना व्हायरसमुळे तणावात असलेल्या लोकांमध्ये त्यानं घबराट पसरत आहे.''