India Vs Leicestershire Warm Up game : इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारताच्या कसोटी संघातील खेळाडूंना सराव सामन्यांत चांगला सराव करून घेतला. लिसेस्टरशायर क्लबच्या रोमन वॉकरसमोर भारताचे स्टार फलंदाज पहिल्या डावात ढेपाळले, परंतु दुसऱ्या डावात त्यांच्याकडून चांगला खेळ झाला. विराट कोहली, शुबमन गिल व केएस भरत यांचा खेळ उल्लेखनीय ठरला. भारताचे काही खेळाडू लिसेस्टरशायरकडूनही खेळले. चेतेश्वर पुजाराने तर ( Cheteshwar Pujara) दोन्ही संघांकडून फलंदाजी केली. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी डबल बॅटींग केली.
भारताने पहिला डाव ८ बाद २४६ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात लिसेस्टरशायरने पहिल्या डावात २४४ धावा केल्या. रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यामुळे दुसऱ्या डावात केएस भरत व शुबमन गिल सलामीला आले आणि त्यांनी ६२ धावांची भागीदारी केली. भरतने ४३, तर गिलने ३८ धावा केल्या. त्यानंतर हनुमा विहारी व श्रेयस अय्यर हे अनुक्रमे २० व ३२ धावांवर माघारी परतले. विराट कोहलीने पहिल्या डावात ३३, तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. भारताच्या दुसऱ्या डावात जडेजा व अय्यर यांनी डबल बॅटींग केली. पण, त्याच धावसंख्येवर ते बाद झाले.