नवी दिल्ली : टी२० विश्वचषकासाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेल्या रमेश पोवार यांचा तीन महिन्यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. यासह इंग्लंडविरुद्ध अनुभवी मिताली राज हिला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने उद्भवलेला वाद देखील शमेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोवार यांचा कार्यकाळ संपताच बसीसीआय या पदासाठी नव्याने अर्ज मागविणार आहे. पोवार यांनी यासाठी अर्ज केला तरी त्यावर विचार होणार नाही, अशी चर्चा आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोवार यांचा कार्यकाळ संपला असून परतण्याची शक्यता कमीच आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी२० महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध अनुभवी मितालीला बाहेर बसविण्यात आले. पोवार यांच्या वागणुकीवर आक्षेप घेत मितालीने कारकिर्द संपविण्याचा त्यांच्यावर आरोप केला होता.पोवार यांच्याआधी तुषार आरोठे यांनी महिला संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत मतभेद झाल्याचे कारण देत पदाचा राजीनामा देताच आॅगस्टमध्ये पोवार यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पोवार यांच्यापश्चात टी२० कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राज परस्परातील मतभेद कशा दूर सारतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)मतभेद दूर करावेहरमनप्रीतने याप्रकरणी अद्याप काही वक्तव्य केलेले नसले तरी उपांत्य सामन्यातून मितालीला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन आधीच केले आहे. मितालीने हरमनसोबतचे मतभेद दूर करण्याची तयारी दाखविली आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की,‘दोन्ही खेळाडूंमधील मतभेद एकत्र बसून दूर केले जाऊ शकतात. दोन्ही खेळाडू देशाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत.’