नवी दिल्ली : आयपीएलच्या १३ व्या पर्वात सहभागी होणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना यूएईत प्रत्यक्ष सराव सुरू करण्याआधी पाचवेळा कोरोना चाचणीत निगेटिव्ह येणे अनिवार्य असेल. स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रत्येक पाचव्या दिवशी कोरोना चाचणी द्यावी लागणार आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला फ्रेंचाईजींशी जुळण्याच्या एक आठवड्याआधी २४ तासात दोनदा कोरोना (आरटी-पीसीआर)चाचणी द्यावी लागेल. यानंतर खेळाडू भारतातच विलगीकरणात राहतील. चाचणीत एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी ती व्यक्ती १४ दिवस विलगीकरणातच राहील.
१९ सप्टेंबरला सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी यूएईकडे रवाना होण्यासाठी विलगीकरण कालावधी संपताच २४ तासात आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक राहील. यूएईत दाखल होताच खेळाडू आणि स्टाफसाठी एक आठवड्याचे विलगीकरण असेल. यादरम्यान तीनवेळा कोरोना चाचणी होईल. निगेटिव्ह आल्यानंतर जैवसुरक्षा वातावरणात प्रवेश मिळेल आणि सरावाची परवानगी असेल. यूएईत पहिल्या आठवड्यात खेळाडू आणि अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये एकमेकांशी भेटता येणार नाही.जे खेळाडू थेट यूएईत दाखल होतील त्यांचे काय, असा प्रश्न करताच हा अधिकारी म्हणाला, ‘सर्व विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला विमान प्रवासाआधी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल. असे न झाल्यास १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल. या काळात दोनदा कोरोना चाचणी होईल. ती निगेटिव्ह असणे अनिवार्य राहील. यूएईतील विलगीकरण काळात खेळाडू आणि स्टाफची पहिल्या, तिसºया आणि सहाव्या दिवशी चाचणी होईल. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ५३ दिवस चालणाºया या स्पर्धा काळात प्रत्येक पाचव्या दिवशी चाचणी घेतली जाईल. बीसीसीआय परीक्षण प्रोटोकॉलशिवाय यूएई सरकारच्या नियमानुसार अधिक कोरोना चाचण्या शक्य आहेत. २० आॅगस्टआधी फ्रेंचाईजींनी यूएईकडे प्रस्थान करू नये, असे सांगण्यात आले आहे. बीसीसीआयने कुटुंब आणि सहकाºयांना सोबत ठेवण्याचा निर्णय संघांवर सोपवला आहे. यासाठी सर्वांना जैवसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावेच लागेल. कुणाशी भेटण्याची परवानगी राहणार नाही. खेळाडूंचे कुटुंबीय एकमेकांशी भेटतील तेव्हा शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे लागेल. नेहमी मास्क घालणे अनिवार्य असेल. सामना आणि सरावाच्या वेळी कुटुंबाला मैदानात प्रवेश मिळणार नाही. जे जैवसुरक्षा नियमाचा भंग करतील त्यांना सात दिवस स्वविलगीकरणात राहावे लागेल. जैवसुरक्षा वातावरणात परतण्यासाठी त्यांना सातव्या दिवशी निगेटिव्ह यावे लागणार आहे.