नवी दिल्ली : ‘चेन्नई सुपर किंग्समध्ये आढळलेले कोरोनाबाधित आयपीएलमध्ये सहभागी आठही संघात आढळू शकले असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ‘बायो बबल’मध्ये (जैव सुरक्षा वातावरण) खेळाडूंसह केवळ ज्यांची गरज आहे अशाच व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा,’ अशी मागणी किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी गुरुवारी केली.
सीएसके पथकातील दोन खेळाडूंसह १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून येताच आयपीएलमध्ये सुरक्षेची चिंता वाढली. या पार्श्वभूमीवर वाडिया म्हणाले, ‘सीएसकेसोबत घडला तो प्रकार कुठल्याही संघासोबत घडू शकतो. सर्वजण काळजी घेतच आहेत मात्र तरीही बायो बबल प्रोटोकॉलचे सक्तीने पालन व्हायला हवे. खेळाडू आणि ज्यांची गरज आहे अशा व्यक्तींना प्रवेश मर्यादित असावा.’
फ्रॅन्चाईजीमधील बिगर खेळाडू, बिगर कोचिंग स्टाफ, संघ परिचालन व्यवस्थापक आणि सोशल मीडिया तज्ज्ञासह खेळाडूंना फोटोशूटदरम्यान मार्केटिंग स्टाफसोबत वेळ घालवावा लागगतो. सध्या संघांचे सीईओ आणि मालकांना बायो बबलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी आहे. यातील अनेक जण यूएईत दाखल झालेले नाहीत. एसओपीनुसार सर्वांना येथे सात दिवस विलगीकरणात रहावे लागेल. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, ‘संघांच्या बाहेरच्या स्टाफची संख्या सहयोगी स्टाफ आणि सामनाधिकाऱ्यांची किमान संख्या असावी.’
तुम्ही आयपीएलसाठी जाणार का, असा प्रश्न विचारताच वाडिया म्हणाले, ‘मी अद्याप निर्णय घेतला नाही, मात्र साधारणपणे खेळाडूंसोबत संवाद साधत नाही. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्यासोबत केवळ दोनदा चर्चा झाली. झूम किंवा अन्य आॅनलॉईन पद्धतीने सहज संपर्क करणे आवडते.’
सीएसकेमध्ये खेळाडू कोरोनाबाधित आढळले ही चिंतेची बाब नाही. युरोपियन फुटबॉल लीगमध्ये आणि एनबीए बास्केटबॉलमध्येही असे घडले असल्याचे वाडिया यांचे मत आहे. बीसीसीआयने आंतरराष्टÑीय स्तरावर असलेले प्रोटोकॉल लागू केले आहेत. त्यामुळे चिंता बाळगण्याचे कारण नाही. लीगचे आयोजन पुढे सरकेल, तशी परिस्थिती चांगली होईल, अशी अपेक्षा वाडिया यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
बीसीसीआय सदस्य कोरोनाबाधित
दुबई : बीसीसीआयसमोर यंदा आयपीएल आयोजनासाठी अनेक अडथळे येत आहेत. सीएसकेच्या १३ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता बीसीसीआय पथकातील एक सदस्य कोरोनाबाधित आढळून आला.
दुबईत आयपीएलच्या तयारीची देखरेख करण्यासाठी आलेल्या बीसीसीआय सदस्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यावर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात यूएईमध्ये आयपीएल रंगणार आहे.
आयपीएलशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. बीसीसीआय पथकातील एका सदस्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण हा सदस्य क्रिकेट संचालक संघाशी संबंधित आहे की आरोग्य पथकाशी संबंधित हे सांगू शकत नाही. अन्य सदस्य ठीक असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. (वृत्तसंस्था)
माघारीचा निर्णय कठीण पण योग्य-रिचर्डसन
साऊथम्पटन : आयपीएलमधून माघारीचा निर्णय कठीण पण योग्य असल्याचे समर्थन आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने केले आहे. पहिल्या बाळाच्या जन्माच्यावेळी मी पत्नीपासून दूर राहू शकत नाही, असे तो म्हणाला. २९ वर्षांच्या रिचर्डसनला आरसीबीने चार कोटी रुपयात खरेदी केले होते. आयपीएलमध्ये खेळू न शकणे निराशादायी असले तरी पुढे आणखी संधी येतील, अशी अपेक्षा या खेळाडूने व्यक्त केली. त्याची जागा लेग स्पिनर अॅडम झम्पा याने घेतली.
Web Title: coronavirus: In 'Bio Bubble', give access to necessary people including players, Ness Wadia demands
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.