त्रिनबागो नाइट रायडर्सनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) शनिवारी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. सीपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत अपराजित राहून सलग 8 सामने जिंकणाऱ्या नाइट रायडर्सनं शनिवारी सेंट ल्युसीआ झौक्सविरुद्ध 5 बाद 175 धावा चोपल्या. या सामन्यात कर्णधार किरॉन पोलार्डनं 200च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करून इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाची जोरदार तयारी केली आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या नाइट रायडर्सच्या सलामीवीरांना मोठी खेळी करता आली नाही. लेंडल सिमन्स ( 8) आणि टिऑन वेबस्टर ( 20) यांना अनुक्रमे स्कॉट कुगेलेईजन आणि जहीर खान यांनी बाद केलं. टीम सेईफर्ट आणि डॅरेन ब्राव्हो यांनी संघाचा डाव सावरला. सेईफर्ट 33 धावा करून माघारी परतल्यानंतर ब्राव्हो आणि पोलार्ड यांनी झौक्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ब्राव्होनं 42 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 50 धावा केल्या. पोलार्डनं 21 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचत 42 धावा केल्या. नाइट रायडर्सनं 5 बाद 175 धावा केल्या.
पोलार्डनं मागील तीन सामन्यांत 72, नाबाद 33 आणि 42 धावा केल्या. त्यानं या खेळीत 15 चौकार व 6 षटकार खेचल्या. यंदाच्या CPLमध्ये आतापर्यंत त्यानं 101 चेंडूंत 207 धावा केल्या आहेत. CPL2020मध्ये त्याचा 204.95 हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. त्यानं CPLमध्ये दमदार कामगिरी करून IPLची जोरदार तयारी केली आहे. पोलार्डनं 148 सामन्यांत 2755 धावा केल्या आहेत. त्यात 14 अर्धशतकांचा समावेश आहे आणि 56 विकेट्स आहेत.