तिरुवनंतपुरम : भारत A आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामना मधमाशांच्या हल्ल्यामुळे पंधरा मिनिटे थांबवण्यात आला. भारत A आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील चौथ्या सामन्यातील या प्रकारामुळे पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, खेळाडू, साहाय्यक प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. हा प्रकार सकाळी 11.05 वाजण्याच्या सुमारास 28व्या षटकात घडला. त्यावेळी इंग्लंड लायन्सचे फलंदाज खेळपट्टीवर होते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या A संघात रिषभ पंत व लोकेश राहुल हे भारताच्या वरिष्ठ संघातील प्रमुख खेळाडू होते.
पश्चिम स्टॅण्ड्सच्या वरच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रेक्षकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यानंतर मधमाशांनी त्यांचा मोर्चा सीमारेषेच्या दिशेने वळवला. त्यामुळे खेळाडूंना मैदान सोडून ड्रेसिंग रुममध्ये जाण्यास भाग पाडले. भारत A संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने मैदानावर फेरी मारून मधमाशा गेल्या की नाही याची शहानिशा केली.
इंग्लंड लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 221 धावा केल्या. ऑली पोप ( 65) आणि स्टीव्हन मुलानी ( 58) यांच्या खेळीमुळे इंग्लंड लायन्सने समाधानकारक पल्ला गाठला. मुंबईकर शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याला राहुल चहरने दोन विकेट घेत चांगली साथ दिली. भारत A संघाने सुरुवातीचे तीनही सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.