मुंबई - मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यामुळेच की काय सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने 8 चेंडू आणि 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर देशभर जल्लोष सुरु झाला. मात्र, टीम इंडियाची फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघ 19 षटकात हा सामना जिंकेल अशी भविष्यवाणी सचिनने केली होती. सचिनची ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्धचा टी-20 सामना सुरू होण्यापूर्वी भविष्यवाणी केली होती. याबाबत पहिले ट्विट करताना इंग्लंडचा संघ 225 धावांपर्यंत मजल मारेल, असे सचिनने म्हटले होते. पण, इंग्लंडला 20 षटकात 198 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर भारताची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी सचिनने ट्विटर अकाऊंवरुन एक भाकित केले. त्यामध्ये टीम इंडिया 19 व्या षटकापूर्वीच सामना जिंकेल, असे त्याने म्हटले होते. सचिनच्या या मताशी 80 टक्के चाहत्यांनी सहमती दर्शवली. अखेर, रोहित शर्माच्या चौकार आणि षटकारांच्या मुसळधार खेळामुळे भारताने 18.4 षटकात सामना जिंकत देवाची भविष्यवाणी खरी ठरवली. हार्दिकने 19 व्या षटकातील 4 थ्या चेंडूवर षटकार ठोकत धोनीस्टाईलने भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर, सर्वांनीच भारताचा मालिका विजयोत्सव साजरा केला.