Dean Elgar, South Africa: दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारता विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एल्गरने ही घोषणा केली होती. केपटाऊन कसोटी हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा एल्गरचा कोणताही विचार नव्हता. पण, दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांना एल्गरला संघात ठेवायचे नव्हते त्यामुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागली, असा दावा करण्यात येत आहे.
नक्की काय घडलं?
डीन एल्गरचा संघात समावेश करण्यास प्रशिक्षक तयार नव्हते. याबद्दल कल्पना आल्यानंतर डीन एल्गरने ही ऑफर प्रशिक्षक शुक्री यांच्यासमोर ठेवली. यामध्ये एल्गर म्हणाला की, त्याला घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर शेवटची मालिका खेळण्याची संधी मिळेल का? प्रशिक्षकांनी त्याची ही मागणी मान्य केल्यानंतर, भारताविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी एल्गरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शुक्री कॉनरॅड प्रशिक्षक झाल्यानंतरच एल्गरला कर्णधारपदही सोडावे लागले होते.
वृत्तपत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्गरने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी काही वरिष्ठ खेळाडूंची इच्छा होती. पण प्रशिक्षकांच्या या वागण्याने तो नाराज झाला आणि निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहिला. शुक्रवारी त्याने इंग्लिश काउंटी क्लब एसेक्ससोबत तीन वर्षांचा करारही केला.
दरम्यान, आपल्या शेवटच्या कसोटी मालिकेतही एल्गर चांगलाच फॉर्मात होता. दक्षिण आफ्रिकेतील चार दिवसांच्या मालिकेत दोन शतकांसह त्याची सरासरी ६० पेक्षा जास्त होती. पहिल्या कसोटीतही त्याने शानदार १८५ धावा केल्या, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला डावाने विजय मिळवून दिला. पहिल्या कसोटीत टेंबा बवुमाला दुखापत झाल्यानंतर एल्गरने अखेरच्या कसोटीतही संघाचे नेतृत्व केले. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याला कमी धावा करता आल्या आणि भारताने दोन दिवसांतच सात विकेट्सने विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली.