लॉकडाउन सुरू असल्याने संपूर्ण क्रीडाविश्व थांबले असताना भारतीय क्रिकेटमध्ये एक वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा हे सध्या इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ‘सध्या कोणतीही स्पर्धा, सामने होत नसल्याने खेळाडूंना वेतन कपात मान्य करावी लागेल.’यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आपल्या स्तंभात म्हटले की, ‘मल्होत्रा यांच्यानुसार खेळाडूंनी का नुकसान भोगावे? सध्याच्या विद्यमान क्रिकेटपटूंपैकी कोणीही इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचा सदस्य नाही. त्यामुळे कोणत्या आधारे मल्होत्रा असे वक्तव्य करू शकतात.’ त्यामुळे सध्या आता या विषयामुळे भारतीय क्रिकेट ढवळले जात आहे.
या मुद्याच्या दोन बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे तांत्रिकदृष्ट्या बघितल्यास गावसकर यांचा मुद्दा अत्यंत योग्यच आहे. जर खेळाडूच या संघटनेचे सदस्य नसतील, तर त्यांना वेतन कपात मान्य करण्याबाबत कसे सांगता येईल. या संघटनेचे काम निवृत्त खेळाडूंसाठी सुरू असते. त्यामुळे अशी सूचना माजी खेळाडूंसाठी ही संघटना करू शकते.लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या स्पष्ट मतानंतर मल्होत्रा यांनी म्हटले की, ‘मी केवळ सध्या होत असलेल्या नुकसानीमुळे असे मत मांडले. पण गावसकर इतके का नाराज झाले माहीत नाही. माझ्याविषयी सांगायचे झाल्यास बीसीसीआयकडून मला ४० हजार रुपये पेन्शन मिळते, त्यात मी ३० टक्क्यांची कपात मान्य करण्यास तयार आहे.’ यासह अशोक मल्होत्रा यांनी स्वत:ची बाजू जरी मांडली असली, तरी इतर खेळाडू हे मानणार का हेही पाहावे लागेल. भविष्यात या वादावर बीसीसीआय काय भूमिका घेणार हेही पाहावे लागेल.
आता वळूया इंडियन प्रीमियर लीगकडे. जर यंदाची आयपीएल झालीच नाही, तर बीसीसीआयला सुमारे साडेतीन-चार हजार कोटींचा फटका बसेल. समजा जर टी२० विश्वचषकासारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धाही नाही झाल्या, तर आर्थिकदृष्ट्या खेळाला खूप मोठा फटका बसेल.त्यामुळे अशा परिस्थितीत वेतनामध्ये कपात होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच वेळी, अनेक क्रिकेटपटूंनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपापल्यापरीने आर्थिक मदतही केली आहे.
याशिवाय प्रत्येक आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यासाठी क्रिकेटपटूंना १५-१६ लाख, तर एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख मिळतात, तसेच टी२० साठी ३ लाख रुपये मिळतात. जर वर्षभरात हे सामने झालेच नाहीत, तर स्वाभाविक आहे की हे मानधन खेळाडूंना मिळणार नाही. असे नाही की, बीसीसीआयकडे राखीव रक्कम नाही. त्यामुळे आमच्या खेळण्याने इतकी मोठी रक्कम मिळवल्यानंतर केवळ एक वर्ष आम्ही खेळलो नाही, तर तुम्ही वेतन कपात करणार का? असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. माझ्या मते या मुद्यावर आता बीसीसीआयने पूर्ण विचार करून एक योग्य निर्णय घ्यावा.
अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत