भारत-पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व साऱ्या जगाला माहित्येय... त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा हे दोन्ही संघ समोरासमोर येतात तेव्हा साऱ्या जगाचं लक्ष निकालाकडे लागलेले असते. २०२१मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या सामन्यानं व्ह्यूअर्सशीपचे सारे रिकॉर्ड तोडले. पण, यावेळचा निकाल हा भारतीय चाहत्यांना चटका देणारा ठरला. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहिलेला भारतीय संघ प्रथमच पराभूत झाला. बाबर आजमच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतावर १० विकेट्स राखून विजय मिळवला. २४ ऑक्टोबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना रंगला होता.
भारतीय संघावर मिळवलेला ऐतिहासिक विजय हा २०२१मधील सर्वोत्तम क्षण होता असे मत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं व्यक्त केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पॉडकास्टवर बोलताना बाबर म्हणाला,''अनेक वर्ष आम्हाला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर विजय मिळवता आला नव्हता आणि तो २०२१मध्ये आम्ही मिळवला. एक संघ म्हणून ही आमच्यासाठी खूप मोठं यश आहे. मागील वर्षातील हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण ठरला.''
वन डे वर्ल्ड कप प्रमाणे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध अपराजित होता, परंतु ही मालिका मागच्या वर्षी खंडित झाली. पाकिस्ताननं प्रथम गोलंदाजी स्वीकारताना संघाल ७ बाद १५१ धावांवर रोखले. शाहिन शाह आफ्रिदीनं पहिल्या तीन षटकांत भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व रोहित शर्मा यांना माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहलीची महत्त्वाची विकेट त्यानं घेतली. विराटनं ४९ चेंडूंत ५७ धावा करताना संघाला १५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम व मोहम्मद रिझवान या दोघांनी १५२ धावांची भागीदारी करून हा सामना सहज जिंकला.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. या वर्षी भारत-पाकिस्तान आशिया चषक ( श्रीलंका) स्पर्धेत एकमेकांना भिडतील. त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही दोघं समोरासमोर येऊ शकतील.