Join us  

धवनचा धमाका; भारताचे श्रीलंकेपुढे 175 धावांचे आव्हान

आपल्या दमदार फटक्यांच्या जोरावर धवनने 49 चेंडूमध्ये सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 90 धावांची तडफदार खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 8:38 PM

Open in App
ठळक मुद्देट्वेन्टी-20 सामन्यांतील पहिले-वहिले शतक धवन झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याचे शतक दहा धावांनी हुकले.

कोलंबो  : निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिला सामना गाजवला तो शिखर धवनने. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धवन भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ ठरला. धवनच्या तडफदार 90 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 174 धावा केल्या आणि श्रीलंकेपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दुशमंथा चमीराने पहिल्याच षटकातील चौथ्याच चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्माला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. रोहितनंतर फलंदाजीला आलेल्या सुरेश रैनाला फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. दुसऱ्याच षटकात भारताची 2 बाद 9 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण या परिस्थितून शिखर धवनने संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी चोख निभावली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. धवनने यावेळी मनीष पांडेला आपल्या साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. पांडेने 35 चेंडूंत 37 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याच्या या खेळीत आत्मविश्वासाचा अभाव होता. 

पांडे बाद झाल्यावरही धवनने आपले आक्रमण कायम ठेवले. सुरुवातीपासूनच धवनची सुरु झालेली आक्रमक फटक्यांची माळ 18व्या षटकापर्यंत कायम राहिली. आपल्या जोरकस फटक्यांच्या जोरावर धवनने श्रीलंकेच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या दमदार फटक्यांच्या जोरावर धवनने 49 चेंडूमध्ये सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 90 धावांची तडफदार खेळी साकारली. ट्वेन्टी-20 सामन्यांतील पहिले-वहिले शतक धवन झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याचे शतक दहा धावांनी हुकले.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८क्रिकेटशिखर धवन