नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आपल्या 'कबड्डी स्टाइल' साठी प्रसिद्ध आहे. एखादा झेल पकडल्यावर आनंद व्यक्त करताना धवन आपल्या मिश्यांना पीळ देतो आणि त्यानंतर 'कबड्डी स्टाइल' मध्ये आपली मांडी थोपटतो. पण तो असं का करतो, याचा उलगडा दस्तुरखुद्द गब्बर म्हणजेच धवनने केला आहे.
धवनची ही स्टाइल बऱ्याच चाहत्यांना आवडली आहे. काही स्थानिक क्रिकेटपटू धवनच्या या स्टाइलची कॉपीही करताना दिसत आहेत. पण ही स्टाइल त्याला सुचली कशी आणि ती स्टाइल तो का करतो, हे रहस्य धवनने एका कार्यक्रमात जाहीर केलं.
'कबड्डी स्टाइल' पहिल्यांदा कधी मारली होती...जेव्हा धवनला त्याच्या या स्टाइलबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, " मी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा या खास स्टाइलमध्ये आनंद साजरा केला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आम्ही कसोटी सामना खेळत होतो. त्यावेळी मी शेन वॉटसनचा झेल पकडला आणि त्यावेळी पहिल्यांदा मी ही स्टाइल मारली होती. "
धवन आहे कबड्डीचा दिवाना...'कबड्डी स्टाइल' बद्दल धवन म्हणाला की, " मला कबड्डी हा खेळ पाहायला फार आवडते. त्यामुळेच मला मैदानात ही स्टाइल कराविशी वाटली. मी ही स्टाइल मनापासून करतो, त्यामुळेच ती लोकांनाही आवडते. जेव्हा मी सीमारेषेजवळ असतो, तेव्हा प्रेक्षक माझ्या स्टाइलची नक्कलही करतात. "