ठळक मुद्दे क्रिकेटमधून निवृत्त झालेला वीरेंद्र सेहवाग आणि अनेक वर्षं संघाबाहेर असलेला गौतम गंभीर हे दोघं 'कमळ' हातात घेऊ शकतात आणि निवडणूकही लढवू शकतात, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनाही वाटतेय.
नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे तीन वीर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सेहवाग आणि गंभीरची पावलं, विधानं पाहता ही जोडगोळी त्या दिशेनं वाटचाल करत असल्याचंही दिसतंय. परंतु, धोनीचं नाव या यादीत आल्यानं त्याचे निकटवर्तीयही गोंधळलेत. आजही क्रिकेटमध्ये यशस्वी इनिंग्ज सुरू असताना धोनी या राजकारणाच्या पीचवर कशाला उतरेल?, असा प्रश्न करत धोनीच्या जवळच्या मित्रांनी हा चर्चा खोडून काढल्यात.
पुढच्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इग्लंडमध्ये होणार आहे. या विश्वचषकात खेळण्याचे ध्येय धोनीने डोळ्यापुढे ठेवले आहे. धोनीकडे सध्याच्या घडीला संघाचे कर्णधारपद नसले, तरी तोच पडद्यामागचा सूत्रधार असल्याचे म्हटले जाते. विराट कोहलीही हे मान्य करतो. कोहलीला दडपणाखाली जेव्हा चांगले नेतृत्व करता येत नाही तेव्हा कॅप्टन कूल असलेला धोनीच संघासाठी धावून येत असल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे फक्त धोनीलाच हा विश्वचषक खेळायचा नाही, तर संघ व्यवस्थापनालाही धोनी संघात हवा आहे. असं असताना, तो अचानक निवडणूक कशाला लढवेल?, याकडे धोनीला जवळून ओळखणाऱ्या एका व्यक्तीनं लक्ष वेधलं.
काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, ती निव्वळ सदिच्छा भेट होती, त्याचा अर्थ २०१९च्या निवडणुकीशी जोडणं योग्य नाही, असं राजकीय जाणकारांनाही वाटतंय.
वीरू, गौती भाजपाच्या वाटेवर
दुसरीकडे, क्रिकेटमधून निवृत्त झालेला वीरेंद्र सेहवाग आणि अनेक वर्षं संघाबाहेर असलेला गौतम गंभीर हे दोघं 'कमळ' हातात घेऊ शकतात आणि निवडणूकही लढवू शकतात, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनाही वाटतेय. भाजपा नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी वीरू आणि गंभीरचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Web Title: Dhoni in BJP's 2019 election field? ... Learn about 'inside news'!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.