हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : महेंद्रसिंग धोनी हा एक चांगला फिनीशर म्हणून ओळखला जातो. काही वेळा विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी धोनी एकेरी धाव घेत नाही. धोनीची अशी कॉपी करायला दिनेश कार्तिक गेला आणि सध्या सोशल मीडियावर तो ट्रोल होताना दिसत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात भारताला विजयासाठी 16 धावांची गरज होती. न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज टिम साऊथी हा अखेरचे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कार्तिकने दोन धावा घेतल्या. या षटकातील दुसरा चेंडू साऊथीने वाईट टाकला, पण पंचांनी हा वाईड बॉल दिला नाही आणि भारतावरील दडपण अजून वाढले.
साऊथीच्या अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ही एक गोष्ट घडली, ज्यामुळे आता कार्तिक ट्रोल व्हायला लागला आहे. तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने लाँग ऑनला एक फटका मारला. हा फटका मारल्यावर कृणाल पंड्या धाव घेण्यासाठी धावत गेला. पण कार्तिकने त्याला माघारी धाडले. यावेळी धोनीसारखा विचार कार्तिक करत असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर तीन चेंडूंमध्ये भारताला 14 धावांची गरज होती. कृणालही चांगली फटकेबाजी करत होता. त्यामुळे कृणालला जर एक धाव घेऊन फटकेबाजी करण्याची संधी कार्तिकने दिली असती तर कदाचित भारतीय संघ हा सामना जिंकूही शकला असता.
न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले. न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. न्यूझीलंडच्या 212 धावांचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवाबरोबर भारताची सलग 10 ट्वेंटी-20 मालिकेतील अपराजित मालिका खंडित झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच ट्वेंटी-20 मालिका गमावली. भारताने यापूर्वी 10 मालिकांमध्ये 9 विजय मिळवले, तर एक मालिका बरोबरीत सोडवली. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला ट्वेंटी-20 मालिकेत एकदाही विजय मिळवू दिलेला नाही.