माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : प्रत्येक कर्णधाराचे काही आवडते आणि नावडते खेळाडू असतात. भारतीय संघातही असेच काहीसे पाहायला मिळते. त्यामुळे हार्दिक पंड्याने कितीही आक्षेपार्ह वक्तव्य केले असले तरी कर्णधार विराट कोहली हा त्याचीच बाजू घेताना पाहायला मिळते आहे. जेव्हा हा प्रकार घडला होता तेव्हा बीसीसीआयची पर्वा न करता कोहलीने पंड्या आणि लोकेश राहुल यांची बाजू घेतली होती.
यावेळी कोहली म्हणाला की, " हार्दिक एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंची संघाला गरज आहे. आगामी विश्वचषकासाठी संघाची बांधणी करताना हार्दिकची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण त्याच्यामुळे संघात योग्य समन्वय पाहायला मिळतो."
यापूर्वी कोहली काय म्हणाला होता...कोहली म्हणाला होता की, " पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत. "
कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली. एकिकडे बीसीसीआय कडक भूमिका घेत असताना याप्रकरणी कोहलीने मात्र पंड्या आणि राहुलचे समर्थन केले होते.
बीसीसीआयने निलंबन घेतले मागे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन बीसीसीआयने अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे पंड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दोघांना दिलास मिळाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्या आणि राहुल यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. पण या दोघांची चौकशी मात्र होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे म्हटले गेले.