भारताने ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेला नमवून नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. यंदाचं वर्ष हे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्यानं प्रत्येक संघ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहेत. श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे आणि त्यासाठी रविवारी संघ जाहीर करण्यात आला. दुसरीकडे सोमवारी आणखी एका संघानं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्यांच्या या संघात दिग्गज खेळाडू तब्बल चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी आणि कोणाचा पत्ता झाला कट
आयर्लंडला वन डे मालिकेत नमवल्यानंतर वेस्ट इंडिजनं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. या संघात त्यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत खेळण्याची इच्छा प्रकट केलेल्या 36 वर्षीय खेळाडूला संधी दिली. ट्वेंटी-20 त त्याच्या नावावर तब्बल 450 सामने आहेत. किरॉन पोलार्डनंतर सर्वाधिक सामने खेळण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. शिवाय 66 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत त्यानं 1142 धावा आणि 52 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचा समावेश हा विंडीजची वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या तयारीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
ड्वेन ब्राव्हो असे या खेळाडूचे नाव आहे. 27 सप्टेंबर 2016मध्ये त्यानं पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानंतर चार वर्षांनी तो राष्ट्रीय संघात पदार्पण करणार आहे. डिसेंबर 2019मध्ये ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेताना ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ''अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धींच्या धावा रोखण्याची कला ब्राव्होमध्ये आहे आणि त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे,''अशी माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजचे निवड समिती प्रमुख रॉजर हार्पर यांनी दिली.